संपूर्ण जगात करोना व्हायरसने थैमान घातलंय. करोनाचं नुसतं नाव ऐकलं तरी भीती वाटावी इतकी या व्हायरसची सध्या दहशत आहे. पण गुजरातमध्ये मात्र लोकं चक्क ‘CORONA’बरोबर सेल्फी घेतायेत. हो तुम्ही बरोबर वाचलंत…कारण हा CORONA म्हणजे व्हायरस नव्हे तर ते एक हॉटेल आहे.

तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण गुजरातमध्ये २०१५ पासून हे CORONA हॉटेल आहे. उत्तर गुजरातच्या सिद्धपूर येथील रहिवासी बरकतभाई यांनी २०१५ मध्ये या हॉटेलची सुरूवात केली. “हॉटेलचं नाव काय ठेवावं याचा विचार सुरू असताना उर्दू भाषेतील ‘कोरोना’ शब्द आठवला. उर्दूमध्ये कोरोना म्हणजे स्टार गॅलेक्सी”,असे बरकतभाईंनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले.

“करोना व्हायरसआधी लोकं या हॉटेलकडे महामार्गालगतच्या एखाद्या सामान्य हॉटेलप्रमाणेच बघायचे. पण, करोना आजार आल्यापासून लोकं हॉटेलसमोर उभे राहतात आणि हॉटेलच्या नावासोबत एक फोटो आवर्जून काढतात”, असेही बरकतभाईं म्हणाले.

गुजरातच्या बनासकांठा या ठिकाणी कोरोना नावाचं हे हॉटेल आहे. दरम्यान सध्या लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद आहे. पण कोरोना नावाचं हे हॉटेल आता लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे. आता या हॉटेलजवळून जाणारे लोकं कोरोनासोबत फोटो आणि सेल्फी आवर्जून घेतायेत. सोशल मीडियावरही या हॉटेलची चर्चा आहे.