Elon Musk Transgender Daughter: गुरुवारी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वॉल्टर आयझॅक्सन लिखित एलॉन मस्क याच्या जीवनावर आधारित पुस्तकात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. ५२ वर्षीय मस्क याने आपण सुरुवातीला आपल्या मुलीच्या लिंग बदलाच्या निर्णयाचं समर्थन करत असल्याची सुद्धा कबुली दिली. पण याचबरोबर त्याने आपल्या मुलीसह नात्यात शाळेमुळे कटुता आली असल्याचा सुद्धा दावा केला आहे.

आयझॅक्सनने पुस्तकात लिहिलेल्या माहितीच्या हवाल्याने द इंडिपेन्डन्टने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क यांच्या मुलीने आपण ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी असल्याची जाणीव झाल्यावर तिच्या काकूला मेसेज केला होता. “मी ट्रान्सजेंडर आहे आणि आजपासून माझे नाव जेना” असं सांगताना तिने आपल्या वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवण्यास सुद्धा सांगितले होते.

विल्सनने गेल्या जून (२०२२) मध्ये कायदेशीर पद्धतीने आपले नाव आणि लिंग बदलले. आणि यानंतर तिने तिच्या प्रसिद्ध वडिलांसह सर्व नातेसंबंध सुद्धा तोडले. यानंतर मस्कने मुलीच्या लिंग बदल निर्णयाला तर स्वीकारले पण तिने नातं तोडण्याचा निर्णय हा शाळेच्या प्रभावाखाली येऊन घेतल्याचा सुद्धा आरोप केला आहे.

मस्क म्हणतो की, “वर्षाला ५०,००० डॉलर फी आकारणाऱ्या शाळेनेच जेनाच्या मनात कम्युनिस्ट विचार रुजवले आहेत. त्यांनीच तिचा ब्रेनवॉश करून सगळे श्रीमंत हे अत्यंत वाईट आहेत असा विचार करायला भाग पाडलं आहे. यामुळेच जेनाच्या वागणुकीत बदल झाला. ती समाजवादाच्या पलीकडे जाऊन आता पूर्णपणे कम्युनिस्ट झाली आहे.” तिला तब्बल २५७.५ बिलियन संपत्तीचे मालक, तिचे वडील एलॉन मस्क सुद्धा वाईट माणूस आहे असे वाटतंय.

हे ही वाचा<< आमिर खानने पुन्हा एवढं वजन कमी केलं? राजकुमार हिरानी यांच्या ‘लाला अमरनाथ’ सिनेमाची चर्चा, पण नीट पाहा..

दरम्यान, लेकीपासून झालेली ताटातूट हा आयुष्यातील सर्वात वेदनादायक अनुभव असल्याचे सुद्धा मस्कने पुस्तकात सांगितले आहे. मस्कच्या पहिल्या बाळाचे सुद्धा जन्माच्या १० आठवड्यांनंतर निधन झाले होते. आणि आता जेनाने सुद्धा सर्व नातेसंबंधांवर पाणी सोडले आहे.