Viral News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या रेडिटवर दररोज शेकडो नोकरदार त्यांच्या कामाच्या ठिकाणी घडलेले अनुभन शेअर करत असतात. यामध्ये नोकरदार काही चांगले अनुभव आणि काही वाईट अनुभव शेअर करत असल्याचं दिसून येतं. आता असाच प्रकारे एका कंपनीतील एका कामगाराने त्याला सुट्टीबाबत आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.
एका कंपनीत काम करत असेल्या या कर्मचाऱ्याला त्याचं डोकं दुखत असल्याने सु्ट्टी हवी होती. मात्र, ‘फक्त डोकं दुखतंय म्हणून सुट्टी मिळत नाही’ अशा प्रकारची प्रतिक्रिया बॉसने देत सुट्टी नाकारल्याचं या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. या दोघांमधील संभाषणाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
नेमकं काय झालं?
एका कर्मचाऱ्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, तो त्याच्या कंपनीतील बॉस बरोबर झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट आहे. त्यामध्ये बॉसने सुट्टी देण्यास नकार देत फक्त डोकं दुखत असल्याने सुट्टी नाकारल्याचं त्याचं म्हणणं आहे. याबाबत या कर्मचाऱ्याने रेडिटवर सविस्तर पोस्ट लिहिली. व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉटनुसार संबंधित बॉस त्या कर्मचाऱ्याला त्याचं डोकं दुखत असतानाही ऑफिसमध्ये येण्याचा आग्रह धरत आहे. एवढंच नाही तर तो बॉस त्या कर्मचाऱ्याला ‘हिरो’ म्हणूनही संबोधत असल्याचं दिसून येत आहे.
‘औषध घ्या अन् ऑफिसला या…’
या कर्मचाऱ्याने रेडिटवर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि पोस्टला कॅप्शन दिलं की, “डोकं दुखत असताना कोणी कसं काम करू शकतं?” दरम्यान, कर्मचारी आणि त्याच्या बॉसच्या संभाषणानुसार, बॉसने कर्मचाऱ्याला म्हटलं की, “तुम्ही औषध घ्या आणि ऑफिसला या. फक्त डोकं दुखत आहे, ते बरं होईल.” यावर कर्मचाऱ्याने उत्तर दिलं की, “मी डोलो (औषध) घेतलं आहे. त्यानंतर काही वेळाने कर्मचाऱ्याने पुन्हा बॉसला मेसेज केला की, “मला अजूनही बरं नाहीये, डोकं दुखत आहे, मी ऑफिसला येऊ शकणार नाही.” त्यानंतर बॉसने म्हटलं की, “औषध घ्या, हिरो. डोकं दुखत असल्याने सुट्टी मिळत नाही. तुम्ही आता शाळेत नाही आहात, तुम्ही कंपनीत आहात. थोडा आराम करू शकता, पण ऑफिसला या.”
नेटकऱ्यांनी काय म्हटलं?
एका युजर्सने म्हटलं की, “जर आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करायला सांगितलं तर भारतातील ५० टक्के ट्रॅफिक समस्या सुटतील. दुसऱ्या म्हटलं की, “हे खूप भयानक आहे. तुम्हाला आजारी रजेचा अधिकार आहे, पण त्यासाठी अर्ज करा.”
तिसऱ्याने एका युजर्सने म्हटलं की, “माझ्या मागील कंपनीत, मी रजा न घेण्याची सवय लावली होती आणि माझा मॅनेजर खूप आनंदी व्हायचा की मी रजा घेत नाही आणि मी गाढवासारखं काम करत आहे. एक दिवस ताप आला आणि त्यामुळे बसणं कठीण होतं. त्यामुळे मी टीममध्ये मेसेज केला की मी ताप आल्यामुळे काम करू शकत नाही. त्यावर मलाही माझा बॉस म्हणाला होता की, तुम्ही अर्धा दिवस काम करू शकता का? तेव्हा मी देखील असंच वागलो होतो, तर माझ्या टीममधील इतर लोक महिन्यातून दोन किंवा तीनदा आजारी रजा घेतात. पण त्यानंतर पुढच्या ४ महिन्यांत मी ती नोकरी सोडली.”