Indian Employees Laid Off By US Company On Zoom Call: अमेरिकेतील एका कंपनीत रिमोट पद्धतीने (वर्क फ्रॉम होम) काम करणाऱ्या एका भारतीय कर्मचाऱ्याने रेडिटवर अचानक कामावरून काढून टाकण्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. रेडिट पोस्टनुसार, भारतातील इतर अनेक कर्मचाऱ्यांसह पोस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्याला, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या ४ मिनिटांच्या व्हर्च्युअल बैठकीत कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगितले.

झूम कॉलमध्ये काय घडलं?

पोस्टमध्ये या कर्मचाऱ्याने बैठकीत नेमके काय झाले हे सांगताना म्हटले की, “तो रोजसारखाच कामाचा दिवस होता. मी सकाळी ९ वाजता लॉग इन केले आणि सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन बैठक असल्याचे कळाले. जेव्हा बैठक सुरू झाला तेव्हा त्यांनी सर्व कॅमेरे आणि मायक्रोफोन बंद केले आणि घोषणा केली की बहुतेक भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कामगिरीशी संबंधित नाही तर कंपनीच्या अंतर्गत पुनर्रचना प्रक्रियेचा भाग आहे.”

कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्याने त्यांच्याशी संवाद साधण्यास नकार दिला. सीओओने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आणि नोकरीवरून काढून टाकत असल्याचे सांगतल्यानंतर लगेचच ऑनलाईन बैठकीतून बाहेर पडले.

हे खरोखरच खूप वाईट…

बैठकीतून बाहेर पडण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्याने बैठकीत असलेल्यांना सांगितले की, ज्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे, त्यांना याची माहिती ईमेलच्या माध्यमातून येईल. याचबरोबर कंपनीने ऑक्टोबरचा पूर्ण पगार महिन्याच्या शेवटी देण्याचे आश्वासन दिले आहे.

या कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये पुढे भावनिक व्यथा व्यक्त करत लिहिले, “मला पहिल्यांदाच कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि हे खरोखरच खूप वाईट आहे.”

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या पोस्टमुळे सोशल मीडियावर ज्या कर्मचाऱ्यांना कामवरून काढून टाकण्यात आले आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. यावेळी अनेक युजर्सनी या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

एका युजरने टिप्पणी केली, “तुम्ही कोणत्या प्रोफाइलमध्ये आहात? जर काही लागले तर मला मेसेज करा, जर शक्य असेल तर मी तुम्हाला मदत करेन.” दुसऱ्याने लिहिले, “भाऊ, तुमचे पद आणि अनुभव किती आहे? कृपया मला मेसेज करा, मी कदाचित तुम्हाला मदत करू शकेन.”