Indian Railway Overcrowded Train Video Viral : सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. प्रवासी अक्षरश: एकमेकांना ढकलून ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी बरोबर लहान मुलं, वयोवृद्ध, महिला आहेत याचाही विचार केला जात नाही. प्रवासी सरळ धक्काबुक्की करत जागा मिळवण्यासाठी धडपडत असतात. यात प्रवाशांबरोबर असलेल्या बॅग्स, सामानामुळे संपूर्ण ट्रेन खचाखचं भरून जातात. या गर्दीत धड पायावर नीट उभं राहण्यासाठीसुद्धा जागा नसते, अनेक प्रवाशांना श्वास घेणंही कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ट्रेनमधील गर्दीमुळे एका तरुणीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अखेर तिने खिडकी उघडून चेहऱ्यावर पाणी मारले, जेणेकरून थोडं बरं वाटेल, पण यावेळी इतर प्रवाशांनी तिची मदत करण्याऐवजी काय केलं हे पाहून तुम्ही तीव्र संताप व्यक्त कराल. अनेकांनी आता ट्रेनमधील या परिस्थितीत गुदमरून प्रवाशांचा जीव जायचंच बाकी आहे असे म्हटले आहे.
गणेशोत्सव, होळीसारख्या सणानिमित्त लांब पल्ल्याच्या ट्रेन्समध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. लोक अक्षरश: ट्रेनचा दरवाजा, टॉयलेटमध्ये बसून प्रवास करताना दिसतात, ज्यामुळे आरक्षित तिकीट बुक करून प्रवास करणाऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. या तरुणीच्या बाबतीतही तेच घडले. ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी होती की एका तरुणीला गुदमरल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखर तिने खिडकी उघडून चेहऱ्यावर पाणी मारले, जेणेकरून आराम वाटेल. यावेळी इतर प्रवाशांनी तिची मदत करण्याऐवजी जवळ उभे राहून हसू लागले; तर अनेक जण तिचा व्हिडीओ शूट करू लागले.
ट्रेनमधील या धक्कादायक परिस्थितीचा व्हिडीओ Woke Eminent नावाच्या एका एक्स युजरने शेअर केला आहे, तर कॅप्शनमध्ये लिहिले की, ट्रेनमधील गर्दीत अडकून एक तरुणी जवळजवळ बेशुद्ध पडली, पण लोक हसत होते; याला काय म्हणायचे? ही पोस्ट त्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग करून, उत्सवांच्या काळात ट्रेनमधील गर्दीचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्याची मागणी केली आहे. मोठ्या स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रवेश थांबवावा आणि सीआरपीएफसारख्या सुरक्षा एजन्सी तैनात कराव्यात, अशी मागणीही त्याने केली आहे.
दरम्यान, या गंभीर घटनेची दखल रेल्वे सेवेच्या अधिकृत खात्याने घेत व्हिडीओवर प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, “हे पाहून आम्हाला काळजी वाटत आहे. कृपया घटनेचे स्थान, तारीख आणि मोबाईल नंबर शेअर करा, जेणेकरून तपास करता येईल. तुम्ही थेट रेल मदत पोर्टलवरदेखील तक्रार दाखल करू शकता.”
दरम्यान, या व्हिडीओवर आता लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, भारतीयांना आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे मदत केली पाहिजे याची शिकवण नाही, शाळांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कसे वागले पाहिजे हे शिकवणे आवश्यक आहे, अन्यथा अशी परिस्थिती आणखी वाढेल. दुसऱ्याने म्हटले की, लोक तरुणीला श्वास घेण्यास त्रास होतोय हे पाहत होते, परंतु मदत करण्याऐवजी ते व्हिडीओ बनवत होते; हे लज्जास्पद आणि अमानवी आहे. तिसऱ्याने लिहिले की, तिथे उपस्थित असलेले बहुतेक लोक सुशिक्षित होते, तरीही असे वर्तन… या परिस्थितीस रेल्वेच्या व्यवस्थेचा अभावही तितकाच जबाबदार आहे.