डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामागील कारण म्हणजे त्याने आगामी ‘छिछोरे’ सिनेमातील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र या पोस्टमुळे भारतीय नेटकरी चांगलेच संभ्रमात पडले आहे. ‘भावा तुला नक्की या फोटोमधून काय म्हणायचे आहे,’ असा सवाल भारतीयांनी केला आहे.
जॉन सीनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सुशांत लष्कराच्या जवानांसोबत उभा असल्याचे दिसत आहे. मात्र या फोटोला कोणतीच कॅप्शन दिलेली नाही. त्यामुळे भारतीय नेटकरी सैराट झाले असून त्यांनी या फोटोवर अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या फोटोवर एकजण म्हणतो, ‘आयुष्यात मला एवढं यशस्वी व्हायचयं की जॉन सीनाने माझा फोटो पोस्ट केला पाहिजे.’ जॉनचा दुसरा एक चाहता आपल्या कमेंटमध्ये म्हणतो, ‘हा तर स्टोन कोल्ड सुशांत सिंह राजपूत आहे.’
जॉनने आपल्या इन्स्टा बायोमध्येच येथील फोटो तुमच्या इच्छेनुसार समजून घ्या असं म्हटलं आहे. ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या इन्स्टाग्रामवर तुमचे स्वागत आहे. येथील फोटो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार समजून घ्या. येथे मी फोटो कॅप्शन आणि स्पष्टीकरणाशिवाय पोस्ट करणार आहे. या फोटोंचा आनंद घ्या,’ असं जॉन आपल्या इन्स्टा बायोत म्हणतो.
दरम्यान जॉनने अशाप्रकारे लोकप्रिय भारतीय व्यक्तींचे फोटो पोस्ट करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने शिल्पा शेट्टी आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्टोन कोल्डचा फोटोशॉप केलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
याबद्दल शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर कमेंटही केली होती. ‘मी नक्कीच जॉन सिनाला अद्याप पाहिलेले नाही तरी हा फोटो एकदम वेगळा आहे,’ असं शिल्पा म्हणाली होती. याआधी जॉनने गायक दिलेर मेहंदी, कपिल शर्मा आणि रणवीर सिंहचाही फोटो पोस्ट केला होता. इतकचं नाही तर १५ ऑगस्टला त्याने भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा फोटोही पोस्ट केला होता.
मात्र आता पोस्ट केलेल्या सुशांतच्या फोटोमधून त्याला काय सांगायेच आहे अद्यापही नेटकऱ्यांना न उलगडलेले कोडे आहे.