पाकिस्तानमधील कराची येथे करोनासंदर्भातील एक विचित्र घटना घडली आहे. येथील कराची महानगर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा सूड घेण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्याने त्याचे चुंबन घेतले. विशेष म्हणजे या कनिष्ठ कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झालेला असतानाच त्याने असं कृत्य केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकऱ्याचे चुंबन घेतल्यानंतर आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे या कर्मचाऱ्याचे सांगितले. हे ऐकतानाच वरिष्ठ अधिकारी चांगलाच खवळला. आता या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

कराची महानगर पालिकेमध्ये काम करणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद होते. त्यामुळेच आपल्या वरिष्ठावर सूड उगवण्याच्या हेतूने कर्मचाऱ्याने त्याचे चुंबन घेतलं. त्यानंतर त्याने आपल्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं. धक्कादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झाल्यानंतर हा कर्मचारी कार्यालयातही गेला होता. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबरच त्याने अनेकांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. बाकी कर्मचाऱ्यांना आपल्या सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते भीतीमुळे ते ऑफिसमधून पळून गेले.

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार महानगर पालिकेमध्ये काम करणारा हा कर्मचारी सहाय्यक निर्देशक आहे. या व्यक्तीने ह्यूमन रिसोर्स म्हणजेच एचआर विभागातील निर्देशकाचे चुंबन घेतलं. मागील काही महिन्यांपासून आपल्याला पगार देण्यात आलेला नाही असा आरोप या करोनाबाधित व्यक्तीने केला आहे. त्यामुळेच या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी आपण करोनाबाधित असतानाही अधिकाऱ्याचे चुंबन घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे या वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित कर्मचारी हा भ्रष्टचाराप्रकरणी दोषी आढळल्याने त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं आहे. हा कर्मचाऱ्याला पाच सप्टेंबरपासून नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला करोनाच्या संसर्गाची भीती नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चार महिन्यांपूर्वीच आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याने मला संसर्ग भीती नाहीय. मात्र या कर्मचाऱ्याविरोधात आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये करोनाचे चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आठ हजारांहून अधिक आहे.