आपल्यापैकी अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास केला असेल. सार्वजनिक व्यवस्थेमधील रेल्वे आणि बस या तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्याला परवडणाऱ्या आणि वेळेवर उपलब्ध असणाऱ्या या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात.
मात्र, या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी असह्य गर्दी तर कधी रस्त्यांवर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी नागरिकांना हैराण करुन सोडते. त्यामुळे सार्वजनिक प्रवास स्वस्त असला तरी मस्त नसतो असं अनेकजण म्हणतात. असाच अनुभव कर्नाटकमधील एका व्यक्तीला आला आहे. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना एका व्यक्तीने आपल्यासोबत लॅपटॉप बाळगल्यामुळे त्याला अधिकचे पैसे द्यायला लागल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
आणखी पाहा- अतिउत्साहात केक भरवायला आला अन् नवरदेवाने मारला मुक्का; घटनेचा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
या व्यक्तीला कर्नाटक राज्य प्रवासी नियमांमधील त्रुटींमुळे दंड भरावा लागला आहे. शिवाय लॅपटॉपमुळे दंड भरावा लागलेल्या व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. या घटनेतील व्यक्ती कर्नाटक परिवहनच्या बसने गडज जिल्ह्याकडून हुबळीला जात होता. त्यावेळी त्याने बसमध्ये काही कामानिमित्त आपल्याकडे असणारा लॅपटॉप बाहेर काढला आणि काम करायला सुरुवात केली.
त्यावेळी बसमधील कंडक्टर त्याच्याजवळ आला आणि त्याने लॅपटॉप वापरल्याचे एक्स्ट्रा दहा रुपये मागितले. शिवाय आपण हे पैसे कर्नाटक राज्य रस्ते परिवहन नियमाअंतर्गत घेत असल्याचं देखील कंडक्टरने सांगितलं आहे. दरम्यान, सरकारी नियमानुसार प्रवास करताना ३० किलोपर्यंत कोणतही सामान आपण मोफत घेऊन जाऊ शकतो.
आणखी वाचा- “९३ हजार विरुद्ध शून्य हा अजूनही…”; नाद करा पण आमचा कुठं! भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांना Final नंतर लष्करी अधिकाऱ्याचा रिप्लाय
मात्र, कर्नाटक परिवहनकडून जाहीर करण्यात आलेल्या सामानाच्या यादीमध्ये इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा समावेश नसल्याने या व्यक्तीला जास्तीचे पैसे भरावे लागलेत. त्यामुळे आता सार्वजनिक वाहनांमध्ये महत्वाची कामं करण्यासाठी लॅपटॉप वापरणं देखील बंधनकारक झालं आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.