दैनंदिन जीवनात जंक फूड खाण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आजकाल अनेकजण मोठ्या आवडीने पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खात असतात. पण तुम्ही खाता ते पदार्थ स्वच्छ आहेत की नाही? याची काळजी घेणं खूप गरेजचं आहे. हो कारण सध्या झारखंडमधील गोड्डा शहरातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ती समजल्यानंतर तुम्हाला पिझ्झा खायचा का नाही? असा प्रश्न पडू शकतो.
आपल्यापैकी अनेकजण नावाजलेल्या ब्रॅंडचे खाद्यपदार्थ डोळे झाकून खात असतात, पण हे खूप धोकादायक ठरु शकतं. खरं तर पिझ्झामध्ये अळ्या सापडल्याची परदेशातील अनेक प्रकरणे यापूर्वीही चर्चेत आली होती. पण आता भारतातील एका घटनेमुळे पिझ्झाप्रेमींना धक्का बसला आहे. कारण मुकेश गाडिया नावाच्या व्यक्तीने प्रसिद्ध फ्रँचायझी डॉमिनोजकडून पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र, त्यांनी पिझ्झा बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये एक अळी सापडली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पिझ्झा नीट बघितला असता स्लाईसमध्येही अळी सापडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही अळ्या जिवंत असल्याचंही मुकेशने सांगितलं. या घटनेची माहिती न्यूज 18 या हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
दोन्ही अळ्या जिवंत सापडल्या –
मुकेश म्हणाला, ‘आजकाल अनेक स्थानिक दुकानांमध्येही पिझ्झा मिळू लागला आहे, पण दर्जाची खात्री असल्याने डॉमिनोजकडून पिझ्झा ऑर्डर केला. घराजवळच पिझ्झा आउटलेट आहे, पण बॉक्स उघडताच मनात पिझ्झाबाबत भिती निर्माण झाली. कारण बॉक्समध्ये आणि स्लाईसमध्ये मला अळ्या आढळल्या. शिवाय आपणाला बॉक्समध्ये अळी दिसली नसती, तर मी पिझ्झा नीट न पाहता खायला सुरुवात केली असती. नावाजलेल्या कंपनीच्या उत्पादनात असं घडू शकतं, असं कधीच वाटलं नव्हतं.’
मॅनेजरने आरोप फेटाळले –
धक्कादायक बाब म्हणजे हा पिझ्झा नीट शिजवला नसल्याची तक्रारही केली आहे. या आरोपांमुळे तक्रारदार मुकेश आणि डॉमिनोज आउटलेट यांच्यामध्ये वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे. भागलपूर रोडवर असलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या स्टोअर मॅनेजरने सांगितले की पिझ्झा २०० डिग्रीवर बेक केला जातो. त्यामुळे त्यामध्ये जिवंत अळी सापडणं अशक्य आहे. तर पीडित मुकेशने सांगितले की, पिझ्झा २०० डिग्रीवर बेक केला जात असेल तर तो पूर्णपणे का शिजवला गेला नाही? या संपूर्ण प्रकरणाची अन्न विभागाकडे चौकशी करण्याची मागणीही मुकेशने केली आहे. हे प्रकरण झारखंडमधील गोड्डा शहराशी संबंधित असून मुकेशचा हा अनुभव पिझ्झा प्रेमींना सावध करणारा आहे.