एका अल्पवयीन मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण आणि त्यानंतर त्याला तसेच फरफट ओडून नेण्याचा पोलिसाचा अमानुष प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलिसाला बडतर्फ करण्यात आले आहे. मध्य प्रदेशमधली ही घटना आहे. मुलाला मारहाण करणारा हा पोलीस मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथे हेड कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहे.  ग्वालिअर रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन चोराने प्रवाशाचे पाकिट मारले. या चोराला प्रवाशांनी पकडले आणि तेथे असणा-या पोलीसाच्या ताब्यात दिले. त्यानंतर या पोलीसाने चोरी केली म्हणून मुलाला अमानुषपणे मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीनंतर मुलगा जागीच बेशुद्ध झाला. पण तरीही या पोलिसाला त्याची दया आली नाही. त्याने या मुलाला तसेच उचलून जमिनीवर आदळले. हा मुलगा उठत नाही हे पाहून पोलिसाने त्याच्या गळ्यात कपडा अडवला आणि त्याला लांबपर्यंत फरफट नेले. मुलाला शुद्ध येत नाही हे पाहून पोलिसाने आणखी मारहाण करून त्याला तिथेच सोडून दिले. एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. मारहाणीनंतर हा पोलीस कर्मचारी वादाच्या भोव-यात सापडल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh grp constable thrashes thief unconscious drags him