मिस युनिव्हर्स २०२५ या वर्षी थायलंडमध्ये होत आहे. या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करणारी मिस इंडिया २०२५ची विजेती मनिका विश्वकर्मा मोठ्या आत्मविश्वासाने, स्टाईलने आणि तिच्या वेगळ्या दृष्टिकोनाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फॅशन समीक्षक तिच्या प्रत्येक लूकचे कौतुक करत असताना तिच्या बुद्धिमान उत्तरांनीही लोकांनी मनं जिंकली आहेत.
मनिका विश्वकर्माचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मनिकाने तिच्या उत्तराने प्रश्न विचारणाऱ्या समीक्षकांनाही प्रभावित केलं. नेमकं मनिका काय म्हणाली ते जाणून घेऊ…
मनिकाचा हा व्हिडीओ ५ नोव्हेंबर रोजी ‘द पेजंट व्हॉल्ट’ या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मुलाखत घेणाऱ्यांनी तिला विचारले, “तुम्ही म्हणाल का की मिस युनिव्हर्समध्ये भाग घेणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे. हा फक्त एकाच महिलेचा प्रवास असतो का? हा प्रश्न ऐकून मनिकाने सुरूवातीला होकार दिला, पण पुढे मात्र तिने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच विचारात पाडलं.
मनिका म्हणाली, “मला ते वाटत नाही. मी इथे उभी आहे कारण माझ्या आईने शिक्षण घेतले आणि तिने मला शिक्षण दिले. मी इथे आहे कारण ऑडिशनच्या दिवशी मला बऱ्याच जणींनी भाग घ्यायला सांगितले होते. माझ्या मैत्रिणींनी मला पाठिंबा दिला. म्हणूनच मी त्या सर्व महिलांना माझ्यासोबत घेऊन जात आहे. मी माझ्यासोबत करोडो स्वप्ने घेऊन जात आहे.”
हे फक्त एका महिलेचे स्वप्न किंवा प्रवास नाही, तर मी माझ्यासोबत बाळगलेल्या अब्जावधी स्वप्नांचे ओझे घेतले आहे. मी माझ्या समुदायाच्या आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करते. प्रत्येक देशात अशा अनेक महिला आणि लहान मुली आहेत, ज्यांना आपल्याकडून प्रेरणा मिळते. त्या आपला प्रवास पाहतात आणि कदाचित पुढे आपल्या मार्गावर चालण्याचे धाडसही दाखवतात.
मनिकाचे उत्तर ऐकल्यानंतर मुलाखत घेणाऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले. मनिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जणांनी म्हटले, आता तिला कोणतेही प्रश्न विचारू नका, ती तिच्या उत्तरांनी सर्वांचे तोंड बंद करेल. तर अनेकांनी मनिकाला एक बुद्धिमान सौंदर्यवती म्हणत ती नक्कीच हा किताब जिंकेल असे म्हटले आहे.
मनिका केवळ तिच्या सौंदर्यानेच नव्हे तर तिच्या नम्रतेनेही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिचा असा प्रतिसाद हा भारतीय महिलांमध्ये जगाची धारणा बदलण्याची शक्ती असल्याचा पुरावा आहे.
