Madhya Pradesh Boy Kurkure Viral Video: मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातील एका आठ वर्षांच्या मुलानं स्वतःच्या आईची पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. कुरकुरे खाण्यासाठी आईनं २० रुपये दिले नाहीत. शिवाय आपल्याला दोरीनं बांधून आई आणि बहिणीनं मारहाण केली, अशी तक्रार लहानग्यानं रडत रडत दिली. प्रकरणाचं गांभीर्य आणि लहान मुलाचं रडणं ऐकून पोलीसही जरा नरमले. त्यांनी या मुलाची कशी समजूत काढली? या घटनेचा मजेशीर व्हिडीओ नक्की बघा.
मुलगा रडत रडत आपली व्यथा मांडत असताना पोलीस आस्थेवाईकपणे चौकशी करत असल्याचे व्हिडीओत दिसून आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं काय घडलं?
सिंगरौली जिल्ह्यातील चितरवई कला या गावात घडली. आठ वर्षांच्या मुलानं ११२ या पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन केला आणि तो रडत रडत व्यथा सांगू लागला. पोलिसांनी परिस्थिती समजून घेतल्यानंतर मुलाची समजूत घातली आणि त्याला लवकरच मदत देण्याचं आश्वासन दिलं. पोलीस गस्ती पथकाच्या गाडीत बसून बोलत असल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.
व्हायरल व्हिडीओ पाहा –
#सोनभद्र सिंगरौली पुलिस को बच्चे ने फोन करके बताया कि कुरकुरे मांगने पर मां ने उसे पीट दिया है। इसपर पुलिस ने ध्यान से बच्चे की बात सुनी और उसके घर जाकर कुरकुरे और चिप्स का तोहफा दिया। pic.twitter.com/SXlP1ogplE
— Abhishek sharma (@officeofabhi) October 4, 2025
खुटार पोलीस ठाण्याच्या प्रभारी शीतल यादव यांनी सांगितले की, ११२ हेल्पलाईन नंबरवर फोन आला होता. एक मुलगा रडत रडत त्याची आई आणि बहिणीची तक्रार करत होता. अरविंद कुमार यांनी मुलाशी आपुलकीने संवाद साधत विषय समजून घेतला. कुरकुरे खाण्यासाठी २० रुपये मागितले म्हणून त्याच्या आईनं आणि बहिणीनं त्याला मारहाण केल्याचा दावा मुलानं केला होता.
पोलीस शिपाई उमेश विश्वकर्मा हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तक्रारदार मुलगा आणि त्याच्या आईची समजूत काढली. मुलाला मारहाण करू नये, असं आईला बजावलं आणि पोलिसांनी आणलेले कुरकुरेचे पॅकेट मुलाला भेट दिले.