Navratri 2025: गुजरातमधील नवरात्र उत्सवाचा थाट काही वेगळाच असतो. देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोच, पण गुजरातचं वेगळेपण कायम उठून दिसतं. असाच एक आगळावेगळा पारंपरिक गरब्याचा प्रकार म्हणजे मशाल रास. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. गुजरातमधील जामनगर इथे खेळला जाणारा हा पारंपरिक मशाल गरबा इथल्या नवरात्रोत्सवाचं खास आकर्षण आहे.

मशाल रासची सुरूवात कधी झाली?

१९५७ मध्ये, पटेल युवक गरबी मंडळाने सादर केलेला हा नेत्रदीपक नृत्यप्रकार आहे. स्थानिक मंडळांनी इतक्या वर्षांनी ही परंपरा जपली आहे. नियमित गरबा किंवा दांडियापेक्षा वेगळा असा हा गरबा रास आहे. यामध्ये सादर करणारे ज्वलंत मशाली हातात घेऊन गरब्याच्या तालावर ठेका धरतात. यामुळे उत्सवाची प्रत्येक रात्र भक्ती आणि शौर्याचं एक चित्तथरारक प्रदर्शन घडवते.

मशालींसोबत नृत्य

मशाल रासचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा गरबा खेळणारे ज्वलंत मशाली हातात घेऊन गरब्याच्या तालावर नाचतात, तेव्हा ते जमिनीवरही आग पसरवतात आणि त्यावर नाचतात. हे केवळ मनोरंजन नाही तर ते श्रद्धा आणि संस्कृती यांची सांगड आहे. पारंपरिक गरबी तालांशी सुसंगत राहून कलाकारांना अगदी सहजपणे मशाली हाताळताना पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध होतात.

जामनगरच्या नवरात्रीचे वैशिष्ट्य

जामनगर हे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील किनारपट्टीवरील रत्न आहे. जामनगर हे गरब्यासाठी पूर्वीपासूनच ओळखले जाते. इथे तलवार रास, गुलाटी रास, मणियारो, दातरदा रास, सालगटी इंधोनी रास आणि सालगाटो साथियो रास अशा विविध रास प्रकारांचा अनुभव घेता येतो. या प्रत्येक प्रकाराचे स्वत:चे असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मात्र, मशाल रास हा सर्वात धाडसीपणाचा प्रकार मानला जातो.

सांस्कृतिक वारसा

मशाल रासला खास बनवणारी एक गोष्ट म्हणजे केवळ सादरीकरणच नाही, तर याचा जपलेला सांस्कृतिक वारसाही आहे. इथे धैर्य, भक्ती आणि सामुदायिकपणाची भावना एकत्र येते. हा वारसा जपणारे जुने गरबी गट केवळ मनोरंजन करणारे नाहीत तर संस्कृतीचे रक्षकदेखील आहेत. त्यांची कला तरूण पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
नवरात्रीच्या काळात जर तुम्ही गुजरातला भेट देत असाल तर मशाल रास सादर करणारे दृश्य हे अविस्मरणीय ठरेल. जामनगरचा हा मशाल रास नवरात्रीला सर्वात अनोख्या उत्सवांपैकी एक ठरवतो.