अनेकदा सोशल मीडियावर जंगली प्राण्यांच्या संघर्षाचे व्हिडीओ पहायला मिळतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हिडीओची चर्चा असून हा व्हिडीओ महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील आहे. या व्हिडीओमध्ये दावणीला बांधलेल्या बैलासमोर नाग फणा काढून उभा असल्याचं दिसत आहे. तब्बल २० मिनिटं हा नाग फणा काढून बैलासमोर उभा होता. तो बैला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. दूरुन हा सारा संघर्ष स्थानिकांनी कॅमेरात कैद केला आहे.

नाग या बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे दावणीला बांधलेला हा बैल या नागाला जराही घाबरला नाही. उलट तो मोठ्या तोऱ्यात त्या नागासमोर उभा होता. समोर फणा काढून डोलत असलेल्या नागाचा थोडाही परिणाम या बैलावर झाला नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडली. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी बैल चारा खात असताना बैलासमोर अचानक पाच फूट लांबीचा नाग आला.

हा नाग बैलासमोर येऊन फणा काढून सलग २० मिनिटं या बैलासमोर उभा होता. त्याने अनेकदा बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. पण बैल जराही डगमगला नाही. बैलासमोर नाग फणा काढून उभा असल्याची बातमी गावभर वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि बघता बघता रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमा झाली. पण कुणीही नागाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे गावकरी दूर उभे राहून नाग आणि बैलाच्या या संघर्षात काय होतं हे पाहत होते.

मात्र बैल जराही डगमगला नाही त्यामुळेच नागानेही त्याला ईजा पोहचवण्याची हिंमत केली नाही. अखेरीस नागाने माघार घेतली आणि तो तिथून जवळच्या झुडपांमध्ये गायब झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला. दिवसभर गावात या घटनेचीच चर्चा होती.