भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंका देशात स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट आणखी गडद होत चाललं आहे. या स्थितीमुळे श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला आहे. एकीकडे सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असताना महिंदा राजपक्षे मात्र पंतप्रधानपदी कायम आहेत. सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.दुसरीकडे सरकारचा विरोध करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश सुरक्षादलांना देण्यात आले आहेत. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर बंदीही लागू केली होती. मात्र रविवारी ही बंदी मागे घेण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता श्रीलंकेचा क्रिकेटर भानुका राजपक्षे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राजपक्षे यांनी देशवासियांना ट्वीटद्वारे एक संदेश देत सरकारला धारेवर धरलं आहे. “मी माझ्या देशापासून कितीही लांब असलो तरीही मला माझ्या सहकाऱ्यांच्या भावना समजू शकतो, जे दररोज संघर्ष करत आहेत. आता त्यांचा आवाज दाबण्यासाठी मूलभूत अधिकारही संपुष्टात आणले आहेत. पण जेव्हा २२ दशलक्ष जनतेचा आवाज एकाच वेळी उठतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नागरिकांचा आवाज ऐकायला हवा. श्रीलंकेतील लोकांना निर्भयपणे जगण्याचा अधिकार मिळायला हवा, अन्यथा ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार नाहीत. लोकांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षित केलं पाहिजे”

भानुका राजपक्षे सध्या आयपीएल १५ व्या पर्वात पंजाब किंग्सकडू खेळत आहे. पंजाब किंग्सने भानुकासाठी ५० लाख मोजले असून आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. पंजाबचा संघ आतापर्यंत एकूण तीन सामने खेळला असून दोन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भानुका राजपक्षेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध २२ चेंडूत ४३ धावा केल्या होत्या. यात २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. कोलकात्याविरुद्ध ९ चेंडूत ३१ धावांची वादळी खेळी केली होती. यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. चेन्नईविरुद्ध ९ या धावसंख्येवर धावचीत झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political situation of srilanka bhanuka rajpakshe react rmt