Reddit Post Of Delhi Man About Salary Goes viral On Social Media: दिल्लीतील एका व्यक्तीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने दावा केला आहे की, तो आणि त्याची पत्नी राजधानी दिल्लीत आरामात राहत आहेत आणि त्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न ७०,००० रुपये आहे. रेडिटवरील पर्सनल फायनान्स कम्युनिटीवर केलेल्या पोस्टमध्ये या व्यक्तीने भाडे आणि किराणा मालापासून ते पाळीव प्राण्यांच्या देखभालीपर्यंतच्या त्यांच्या खर्चाची तपशीलवार माहिती दिली आहे. याचबरोबर त्याने दावा केला आहे की, दिल्लीत “श्वास घेण्यासाठी” ७ लाख रुपये पगाराची आवश्यकता नाही.
‘मी महिन्याला ५० हजारांपेक्षा कमी कमावतोय आणि तरीही दिल्लीत शांतपणे श्वास घेतोय’, असा या रेडिट युजरच्या पोस्टचा मथळा आहे. यामध्ये त्याने असेही नमूद केले आहे की, कधी कधी महिनाभरात त्याची कमाई ५० हजार रुपयेही होत नाही, कारण तो फ्रीलान्स कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतो.
“इतरांच्या तुलनेत, मी कदाचित जास्त कमावत असेन. माझी जोडीदार नियमित पूर्णवेळ नोकरी करते. यातून मी आणि ती कोणत्याही त्रासाशिवाय आमच्या घरातील सर्व गरजा पूर्ण करतो,” असे युजर त्याच्या रेडिट पोस्टमध्ये पुढे म्हणाला आहे.
पोस्टनुसार, हे जोडपे दक्षिण दिल्लीत डीडीएच्या २ बीएचके फ्लॅटमध्ये राहते, ज्याचे भाडे २४,००० रुपये आहे. ते दरमहा भाड्याने घेतलेल्या फर्निचरवर ५,००० रुपये, घरकाम, स्वयंपाक आणि किराणा सामानावर २०,००० रुपये खर्च करतात. ५,००० रुपये युटिलिटीज व विविध सब्स्क्रिप्शन शुल्कासाठी बाजूला काढतात, तर १०,००० रुपये बाहेर खाणे, खरेदी आणि इतर विवेकाधीन खर्चासाठी वापरतात.
“आमच्याकडे पर्यटनासाठी कोणतेही बजेट नाही, परंतु आम्ही बजेट बनवून भारत आणि जवळच्या काही आशियाई देशांमध्ये प्रवास करण्याची योजना आखत आहोत,” असेही या युजरने पोस्टमध्ये सांगितले आहे.
या पोस्टमध्ये पुढे असे सांगितले आहे की, त्यांच्याकडे तीन पाळीव प्राणी असून, सध्या त्यापैकी फक्त एकच प्राणी त्यांच्याबरोबर आहे. या जोडप्याचा गरज पडल्यास अधूनमधून वैद्यकीय खर्च होतो. त्यांच्याकडे कार, लक्झरी गॅझेट्स, क्रेडिट कार्ड नाहीत. याचबरोबर त्यांच्यावर कोणत्याही ईएमआय किंवा कर्जाची जबाबदारी नाही.
“नाही, आम्हाला श्वास घेण्यासाठी महिन्याला ७ लाख रुपयांची आवश्यकता नाही. आम्ही महिन्याला ७०,००० रुपये कमवतो. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही मध्यमवर्गीय, सुविधाप्राप्त भारतीय आहोत जे हे करू शकतात. मला आशा आहे की गुडगावमध्ये राहणारे ७ लाख रुपये कमवणारे लोक हे समजून घेतील,” असे त्याने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.