Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये बुधवारी (३० एप्रिल) एका मोबाईल दुकानाच्या मालकाकडून भरदिवसा ५०,००० रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोराने मोबाईल दुकानाच्या मालकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की दरोडेखोर रोख रक्कम घेऊन पळून जात आहे आणि दुकानदार त्याचा पाठलाग करत आहे.
बिजनोरमधील सुहेल नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल दुकानात दरोडा पडला. नियमित ग्राहक असल्याचे भासवून एक व्यक्ती सुहेलच्या मोबाईल दुकानात घुसली तेव्हा ही घटना घडली. वृत्तानुसार, त्या व्यक्तीने प्रथम सुहेलला त्याचा मोबाईल फोन १९ रुपयांना रिचार्ज करण्यास सांगितले. संपूर्ण घटनेदरम्यान त्याने मास्क घातला होता. काही मिनिटांनंतर, त्याने २९ रुपयांचा दुसरा रिचार्ज मागितला. सुहेल रिचार्ज करण्यात व्यस्त असताना, त्या व्यक्तीने त्याच्या जॅकेटमध्ये लपवलेली लाल मिरची पावडर बाहेर काढली. त्यानंतर अचानक त्याने सुहेलच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, ज्यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या आणि त्याला काहीच दिसेनासे झाले. तो वेदनेने ओरडत होता याच गोंधळाचा फायदा घेत त्या माणसाने लगेच ड्रॉवरमधून ५०,००० रुपये घेतले आणि पळून गेला. सुहेल पैसे हिसकावत असताना त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ५०,००० घेऊन चोर दुकानातून बाहेर पळू लागला.
सुहेलने त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यात जळजळ होत असल्याने तो नीट पाहू शकला नाही. त्याने चोराचा पाठलाग केला, परंतु तो त्याला पकडू शकला नाही. त्याने मदतीसाठी ओरड केली आणि जवळचे लोक त्याच्याकडे धावले. त्यांनी सुहेलचे डोळे धुण्यास मदत केली आणि पोलिसांना कळवले.
पाहा व्हिडीओ
पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरोडेखोराची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत.