कधीकधी अशा धक्कादायक घटना घडतात की त्या वाचून आपणही हैराण होतो. सध्या अशीच एक घटना केरळ राज्यात घडली आहे. केरळ येथील एक ३० वर्षीय महिला गेल्या ५ वर्षांपासून पोटदुखीच्या समस्येने हैराण होती. मात्र या समस्येचे कारण समोर आल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या महिलेच्या पोटात एक कात्री अडकलेली होती. यामुळे या महिलेला तीव्र वेदनेचा सामना करावा लागत होता. ही कात्री तिच्या पोटात कधी आणि कशी गेली हे जाणून घेऊया.
२०१७ साली कोझिकोड येथे राहणाऱ्या हर्षीना नावाच्या महिलेची एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती झाली. यावेळी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला तब्बल पाच वर्षे तीव्र पोटदुखीचा सामना करावा लागला. हर्षीनाला ३० नोव्हेंबर २०१७ रोजी तिच्या तिसऱ्या प्रसूतीसाठी कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचे सिझेरियन झाले होते. शास्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पोटात शस्त्रक्रियेची कात्री राहिली होती. यानंतरच तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला.
हर्षीनाने सांगितले की तिने आपल्या पोटदुखीच्या समस्येवर अनेक उपचार केले. मात्र कशानेही तिला फरक पडला नाही. वेदना सहन करत पाच वर्षे निघून गेली. मात्र, जेव्हा या वेदना असह्य झाल्या तेव्हा तिने हॉस्पिटलमध्ये जाऊन सीटी स्कॅन करून घेतले. यामध्ये तिच्या पोटात धातूची वस्तू असल्याचे समोर आले. यानंतर ही वस्तू कात्री असल्याचे सिद्ध झाले.
यानंतर लगेचच तिला त्याच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर शस्त्रक्रिया करून ती कात्री बाहेर काढण्यात आली. हर्षीनाच्या पोटातून तब्बल ११ सेंटीमीटर लांबीची कात्री बाहेर काढण्यात आली. अखेर पाच वर्षांनंतर तिला पोटातील असह्य वेदनांपासून मुक्तता मिळाली आहे. दरम्यान हर्षीनाने डॉक्टरांच्या या निष्काळजीपणावर कठोर टीका केली आहे. इतकंच नाही तर तिने आता मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्याकडे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या त्रासाची तक्रार केली आहे.