स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला स्वामी नित्यानंद गेल्या काही वर्षांत विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या घटनेमुळं चर्चेत आला आहे. ‘कैलास’ नावाचं स्वतंत्र हिंदूराष्ट्र स्थापन केल्याचा दावा करणाऱ्या नित्यानंदने आता या कथित राष्ट्राच्या शिखर बँकेची स्थापनाही केली आहे. या बँकेचं त्यानं ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ असं नामकरणही केलं आहे. तसेच या गणेश चतुर्थीला तो या बँकेचं चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मिरर नाऊच्या वृत्तानुसार, स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना आश्रमात डांबून ठेवण्यासह इतर बलात्कारप्रकरणी आरोप आहे. त्याने ५० न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलनं त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे. बलात्कार प्रकरणाची अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी करोनाच्या संकटामुळं थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी याच महिन्यांत कर्नाटकमध्ये होणार आहे.
Self-styled godman & rape accused #Nithyananda, in a video, announces that he’s set up a bank called Reserve Bank of Kailasa & the currency will be announced on #GaneshChathurthi. Nithyananda roams free despite being accused of sexual assault & has missed over 50 hearings so far pic.twitter.com/J70G7acag6
— Mirror Now (@MirrorNow) August 17, 2020
नित्यानंदने अमेरिकेतील एका बेटावर स्थापन केलेल्या ‘कैलास’ या देशाच्या बँकेची स्थापना केली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की, “बँक आणि तिची आर्थिक धोरणं तयार आहेत. येत्या गणेश चतुर्थीला आम्ही ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ आणि त्याच्या चलनासंबंधी सर्व माहिती जाहीर करणार आहोत.”
“सर्व कायदेशीर प्रक्रियांचे केले पालन”
नित्यानंद आपल्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगतो की, “३०० पानांची आर्थिक धोरणांसंबंधीची कागदपत्रे, चलन आणि त्याचा वापर याबाबत सर्वकाही तयार आहे. यासंदर्भात कैलास या देशासोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून आम्हाला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ही संस्था कायदेशीर असणार आहे.”
स्वामी नित्यानंद हा सन २०१० मधील बलात्कार प्रकरणातील आरोपी असून जामिनावर त्याची सुटका झाली होती. त्यानंतर तो देशातून पळून गेला. दरम्यान, फेब्रुवारी २०२० रोजी कर्नाटक हायकोर्टाने त्याचा जामीन रद्द केला. गुजरातमधील आश्रमात त्याने लहान मुलांना बेकायदेशीररित्या बंदिस्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
