Viral Video Students Working: शाळा… जिथे मुलांचं भविष्य घडतं, जिथे फळ्यावरच्या अक्षरांतून आयुष्याची दिशा ठरते. पण विचार करा, जर हेच ‘ज्ञानाचं मंदिर’ न राहता ‘काहीतरी वेगळं’ बनलं तर? एका सरकारी शाळेतून समोर आलेलं दृश्य पाहून तुमचं मन सुन्न होईल. शिक्षणाच्या नावाखाली चाललेलं हे वास्तव ऐकून विश्वास बसणार नाही.
एका छोट्याशा प्राथमिक शाळेत दिवसाच्या उजेडात जे घडलं, त्यानं शिक्षणव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. मुलांच्या हातात पुस्तकं आणि पेन असायला हवं होतं, पण इथं दिसतं काहीतरी असं… जे पाहून प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल “हेच का आपल्या मुलांचं भविष्य?”
शिक्षण हा मूलभूत हक्क…, पण जर हेच शिक्षण लहानग्यांच्या हातातून फावडं आणि वाळू उचलण्याचं साधन बनलं तर? अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तराखंडमधून, जिथं एका सरकारी प्राथमिक शाळेत लहान मुलांना वर्गात शिकवण्याऐवजी मजुरासारखं काम करायला लावलं जात आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच संतापाचा स्फोट
देहरादूनच्या बंजारावाला भागातील या शाळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, सात-आठ वर्षांच्या छोट्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक नसून वाळूच्या बादल्या दिसत आहेत. काही मुले डोक्यावर रेती उचलून नेत आहेत, तर काही जण शाळेच्या आवारात बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. ही तीच मुलं आहेत, ज्यांनी शाळेच्या वर्गात बसून स्वप्नं पाहायला हवी होती, डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होण्याची; पण वास्तव इतकं कडवं आहे की तीच मुले आज बालमजूर बनवली जात आहेत.
पूर्वीही आली होती लाजिरवाणी घटना
ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच चमोली जिल्ह्यातील थराली ब्लॉकमधील गोठिंडा गावातील शिक्षकाचा एक व्हिडीओ समोर आला होता, जिथं त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून स्वतःची कार धुवून घेतली होती. आता पुन्हा देहरादूनच्या घटनेने शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रचंड प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शिक्षणाचा हक्क की बालहक्कांचा भंग?
‘शिक्षणाचा हक्क’ (RTE) या कायद्याने देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देतो, पण या घटनांनी दाखवून दिलं की हा हक्क अजूनही फक्त कागदावरच आहे. गरीब कुटुंबातील मुलं शाळेत येतात, पण शिक्षणाऐवजी त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जाते, हे केवळ शिक्षणाच्या हक्काचं उल्लंघन नाही, तर बालहक्कांवर थेट गदा आहे.
जनतेचा आक्रोश आणि चौकशीचे आदेश
व्हिडीओ समोर येताच लोक संतापले आहेत. सोशल मीडियावर #JusticeForStudents ट्रेंड होत आहे. “शिक्षकच जर शिक्षणाची थट्टा करतील तर मुलांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले असले तरी लोकांचा रोष ओसरण्याचं नाव घेत नाहीये.
येथे पाहा व्हिडीओ
कागदोपत्री चौकशी आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन आता लोक विचारत आहेत, या मुलांच्या हातात पुन्हा पुस्तकं केव्हा येणार आणि फावडी कधी जातील?