अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये भारताच्या शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून संघाच्या विजयाचा पाया रचला. पाच सामन्यात ११३ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा चोपणारा शुभमन गिलच्या अंतिम सामन्यातील प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आता त्याच्या चाहत्यांमध्ये आणि एकूणच क्रिकेटप्रेमींमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे शुभमन आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची खेळी समान आहे. मंगळवारी नाबाद १०२ धावा केल्यानंतर त्याने आपल्यातील दाखवलेले पैलू हे विराटच्या खेळीच्या जवळ जाणारे असल्याचे दिसते.
ज्याप्रमाणे भारतीय कर्णधार विराट कोहली कव्हर आणि मिड विकेट दोन्हीकडे सुंदर फटकेबाजी करतो तीच शैली शुभमनच्या फलंदाजीत दिसून येते. तो कोहलीप्रमाणेच बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट अशा दोन्ही बाजूला अगदी ‘क्रिकेट बूक शॉर्टस’ खेळतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खेळात शेवटपर्यंत टिकून राहण्याचे शुभमनचे कसबही विराटप्रमाणेच असल्याचे दिसून येते. फलंदाजीबरोबरच शुभमन क्षेत्ररक्षणातही उजवा असल्याचे आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिसून आले.
शुभमनचा स्ट्राईक रेट ११७.२९ असून तो अतिशय कौतुकास्पद असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचेही क्रिकेटमधील भवितव्य विराट कोहलीप्रमाणेच उज्ज्वल असेल असे म्हणायला हरकत नाही. भारतीय क्रीकेट विश्वात आपल्या खेळीने क्रीडारसिकांची मनं जिंकणाऱ्या शुभमनने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. मोहालीमध्ये स्थायिक होण्यापूर्वी सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने खेडेगावतच क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्याच्या करिअरचा आलेख नेहमीच उंचावल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयकडून २०१३-१४ मध्ये १४ वर्षांखालील आणि २०१४-१५ मध्ये १६ वर्षांखालील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला होता.