Viral News : “हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. ” इतरांना नि:स्वार्थ भावनेने मदत करणे हीच खरी माणूसकी आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात आपण स्वत:कडे लक्ष देत नाही अशात दुसऱ्याची मदत करणे खूप क्वचित पाहायला मिळते. सध्या फेसबूकवर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका तरुणाने उबरचालकाच्या मुलीची इच्छा पूर्ण केली आहे. या तरुणाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये उबरचालकाची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तरुणाचे नाव किरण वर्मा आहे आणि तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगतो, “मी आज उबर कॅब बूक केली. ड्रायव्हर आला आणि मी कॅबमध्ये बसलो. प्रवासादरम्यान ड्रायव्हरला खूप कॉल येत होते पण त्याने दोन ते तीन वेळा कॉल बंद केले. त्यानंतर मी त्याला फोन उचलण्यास सांगितले तेव्हा त्याने फोन उचलला. कॉलवर त्याची मुलगी होती. त्या चिमुकलीचा मला थोडा आवाज येत होता. त्याची मुलगी त्याला स्कूल बॅग पाहिजे आहे, असा हट्ट करत होती. सुरूवातीला ड्रायव्हरनी टाळले त्यानंतर मुलीला सांगितले की आईला फोन दे. त्यानंतर तो म्हणाला, “मी थोडे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण मी पुढील दोन तीन दिवसांमध्ये नवीन बॅग विकत घेऊ शकत नाही कारण मी नुकतीच तिच्यासाठी पुस्तके आणली आणि महिन्याचं बिल सुद्धा भरावे लागेल.” तो फोनवर असताना मी माझे उतरण्याचे ठिकाण बदलले आणि ड्रायव्हरला माझ्याबरोबर येण्यास सांगितले. ड्रायव्हर सुद्धा काहीही न विचारता माझ्याबरोबर आला. मी त्याला एका बॅगच्या दुकानात घेऊन आलो आणि एक स्कूल बॅग विकत घेतली. माझ्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते म्हणून मी पत्नीच्या अकाउंटमधून पेमेंट केला आणि बॅग त्याच्या हातात दिली. बॅग हातात दिल्यानंतर तो अवाक् झाला आणि मला धन्यवाद म्हणाला. एकही शब्द न बोलता आम्ही गाडीजवळ पोहचलो आणि मी म्हणालो, “आज तुमच्या मुलीला सरप्राइज द्या”

हेही वाचा :

पुढे किरण वर्माने लिहिलेय, “त्याने मला माझा नंबर विचारला आणि त्यानंतर मी एक त्याच्याबरोबर फोटो काढला जो मी त्याला पाठवला. एखाद्या तासानंतर त्याने मला त्याच्या मुलीचा फोटो पाठवला. फोटोमध्ये ती बॅग घेऊन उभी होती. हा फोटो खूप खास होता. आपण अनेकदा ओला उबरच्या चांगली सेवा न देणाऱ्या ड्रायव्हर्सना भेटतो पण कधी कधी आपल्याला वडील म्हणून सुपरहिरो भेटतात. माझ्याकडे शब्द नाही. खरंच प्रत्येक वडिलांना सलाम जे कधीही त्यांच्या मुलांना निराश करत नाही. मला माहीत आहे माझी पत्नी पैसे खर्च केल्यामुळे रागवणार नाही. दयाळू व्हा आणि गरजूंना मदत करा. जग तुम्हाला खूप सुंदर वाटेल.”

Kiran Verma या फेसबूक अकाउंटवरून ड्रायव्हरबरोबरचा आणि ड्रायव्हरच्या मुलीचा बॅग हातात घेऊन असलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ड्रायव्हरचा आणि त्याचा मुलीचा चेहरा ब्लर केला आहे. त्यांची ओळख लपवलेली पाहून अनेक युजर्सना आनंद झाला आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “जगाला तुझ्या सारख्या माणसांची गरज आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हे वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल.” आणखी एका युजरने लिहिलेय, “पोस्ट वाचून मला रडू आले. मी खूप भावनिक झाली”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social activist kiran verma buys schoolbag for uber drivers daughter his facebook post melt your heart netizens said this is real humanity ndj