रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोजवळील ओरेखोवो-जुएवो शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. येथील एका फुटबॉल मैदानात सरावादरम्यान एका १६ वर्षीय खेळाडूवर वीज पडली. या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले मात्र सध्या तो कोमात आहे. यासंदर्भातील वृत्त डेली मेलने दिलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार वीज या मुलाच्या मानेवर पडली. त्यामुळे या मुलाला मानेवर मोठी जखम झाली आहे. या खेळाडूचे नाव इवाज जोबोर्सकी असं आहे. इवान हा गोलकीपर आहे. ही घटना घडली तेव्हा तो पेनल्टी शूटचा सराव करत होतो. वीज पडल्यानंतरही इवान जिवंत राहिला हा चमत्कारच आहे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> हा वीजेचा फोटो म्हणजे प्रत्येक फोटोग्राफरच स्वप्नच जणू… जाणून घ्या ‘या’ भन्नाट फोटोमागील कथा
इवान हा ज्नाम्या या स्थानिक फुटबॉल क्लबकडून खेळतो. स्थानिक पातळीवर इवान हा लोकप्रिय आहे. ही घटना घडली तेव्हा सरावासाठी इवानचे इतर काही सहकरीही मैदानात उपस्थित होते. हा अपघात घडला तेव्हा हलका पाऊस पडत होता. एकंदरित वातावरणही खराब होतं. मात्र अशाप्रकारे वीज पडणं अगदीच अनपेक्षित होतं असं तेथे उपस्थित असणाऱ्या इवानच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे. घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वीज पडताना दिसत आहे. वीज पडल्यानंतर इवान जागेवरच बेशुद्ध पडला. त्याचा श्वासही थांबला. इवान पडल्याचे समजताच त्याचे सगळे सहकारी त्याच्या दिशेने धावले. त्याच्या प्रशिक्षकांनी त्यांला माउथ टू माउथ रेस्पिरेशन पद्धतीने कृत्रिम श्वास दिल्यानंतर आणि छातीवर जोर दिल्यानंतरच इवान पुन्हा श्वास घेऊ लागला.
नक्की वाचा >> तुम्हाला माहितेय वीज कशी तयार होते? आणि वीज पडल्यास काय करावे?
इवानला हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेतून मोस्कोमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी तो कोमामध्ये असल्याचे सांगण्यात आलं आहे.
