पहिली नोकरी हे अनेकांसाठी स्वप्न असतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण नोकरीसाठी निवडले जातो आणि त्यानंतर आपल्याला नोकरीच्या पहिल्या दिवशी काय घडेल याची उत्सुकता असते. मात्र पहिली नोकरी मिळाल्यानंतर पहिल्या तीन तासातच कुणी राजीनामा दिला तर? Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणाने पोस्ट लिहिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरुन बरीच चर्चाही सुरु झाली आहे.
काय आहे कर्मचाऱ्याची रेड इट पोस्ट?
आज नोकरीचा पहिला दिवस होता. मला घरुन काम मिळालं होतं. कमी ताण असलेली जबाबदारी मिळाली होती. पण ९ तासांची शिफ्ट करायची होती. मला महिन्याला १२ हजार रुपये पगार आहे. मी विचार केला आणि पहिल्या तीन तासांनी राजीनामा दिला. कारण मला पहिल्या तीन तासातच जाणवलं की मी नऊ तास शिफ्ट करु शकणार नाही. त्यामुळे मी नोकरी सोडली आहे. मला वाटत नाही की इथे नोकरी करुन माझं करिअर वाढवू शकेन. असं म्हणत या युजरने ही पोस्ट लिहिली आहे जी व्हायरल झाली आहे.
मला पार्ट टाइम नोकरीच हवी होती पण..
तसंच हा युजर पुढे म्हणतो की मला सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की हा पार्ट टाइम जॉब आहे. नंतर सांगितलं की फुल टाइम करावं लागेल. मी ही नोकरी मिळवण्यासाठी परीक्षाही दिली होती. कारण मी पार्ट टाइम नोकरीच शोधत होतो. मला त्यांनी पार्ट टाइम जॉब ऑफर केला आणि नंतर सांगितलं की तुला पूर्ण वेळ काम करावं लागेल. मग मी विचार केला की मी इथे काम करु शकणार नाही त्यामुळे मी राजीनामा दिला. असं या युजरने म्हटलं आहे. ज्यावर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल पोस्टवर नेटकरी काय म्हणत आहेत?
या तरुणाची पोस्ट व्हायरल झाली. ज्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तुझ्यासारख्या तरुणांमुळे ज्यांना खरंच नोकरी हवी आहे अशांचंही नुकसान होतं आहे. कारण तुझ्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एकाने म्हटलं आहे की तू योग्य केलं आहेस असं मला वाटतं जर कंपनीने तुला पार्ट टाइम जॉब देतो म्हटलं होतं तर तोच द्यायला हवा होता. शिवाय अवघ्या १२ हजारांसाठी फुल टाइम काम करावंस असं नाही. आणखी एका युजरने म्हटलं आहे तू मूर्ख आहेस. पहिल्या तीन तासांत कुणी नोकरी सोडतं का? तिथला अनुभव काय आहे हे शिकून मग नवी नोकरी शोधायला हवी होतीस. तुला स्विच करताना तो अनुभव कामात आला असता. आणखी एका युजरने म्हटलं आहे की तुला काय करायचं आहे हे तुला माहीत आहे का? ते माहीत नसेल तर कुठेही नोकरी कर असंच होईल. असं म्हणत युजर्सनी कमेंट केल्या आहेत.
