ख्रिसमस अगदी दोन-तीन दिवसांवर आलेला असताना घराघरांमध्ये ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियात एका महिलेनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवून ठेवला होता.
त्या ख्रिसमस ट्रीवर एक ते सव्वा मीटरचा विषारी साप वेटोळे देऊन बसलेला तिला दिसून आला. टायगर स्नेक या जातीचा हा साप असून हा साप अत्यंत विषारी आहे हे लक्षात आल्यावर तिने सर्पमित्राला बोलवले. बॅरी गोल्डस्मिथ नावाचे सर्पमित्र तेथे त्वरीत पोहचले आणि त्यांनी त्या सापाला पकडले. त्यानंतर हा साप जंगलात सोडून देण्यात आला.
घराचा दरवाजा उघडा पाहून हा साप घरात आला असावा. दाराजवळच असणाऱ्या ख्रिसमस ट्रीवर तो चढून बसला, असे गोल्डस्मिथ यांनी म्हटले. टायगर स्नेक हे किनारी भागात आढळतात आणि ते अत्यंत विषारी असतात असे गोल्डस्मिथ यांनी म्हटले.
जेव्हा त्या महिलेनी सापाला पाहिले त्यानंतर ती प्रसंगावधान राखून घराबाहेर आली. दरवाजा बंद होऊ नये म्हणून तिथे टॉवेल ठेवला आणि नंतर मला फोन केला असे गोल्डस्मिथ म्हणाले.
घरात साप आढळल्यावर घाबरुन न जाता तुम्ही सर्पमित्राला किंवा अग्नीशमन दलाला फोन करायला पाहिजे असे ते म्हणाले. सापाला पकडल्यानंतर तो जंगलात सोडून देण्यात आला.
टायगर स्नेक ही सुरक्षित प्रजातींपैकी एक आहे. गोल्डस्मिथ यांना साप पकडण्याचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनेक विचित्र ठिकाणी साप आढळून आले आहेत. फ्रीज, वॉशिंग मशीन, टॉयलेट, किचनचे सज्जे अशा अनेक ठिकाणी साप आढळून येतात असे ते म्हणाले.