मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणारं ट्विटर डाऊन झालं आहे. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

“तुमच्यापैकी अनेकांना ट्विटर डाऊन असल्याची समस्या जाणवत आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या सिस्टीममध्ये काही त्रुटी निर्माण झाली होती. दरम्यान सुरक्षेसोबत छेडछाड किंवा हँकिंचा कोणताही पुरावा सापडलेला नाही,” अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे.

अनेक युजर्सना पहाटेच्या सुमारास ही समस्या जाणवत होती. एक ते दीड तासानंतर ट्विटर पुन्हा एकदा व्यवस्थित सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अनेक देशांमध्ये #TwitterDown हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.

जुलै महिन्यात ट्विटरने हॅकर्सकडून इंटर्नल सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली होती. यावेळी हॅकर्सकडून काही प्रतिष्ठित व्यक्तींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न होता असं ट्विटरकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान ऑगस्टमध्येही ट्विटर अशा पद्धतीनं ठप्प झालं होतं. ट्विटरचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. जवळपास सव्वा तास ट्विटर ठप्प होतं.