युक्रेनच्या एका महिलेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय पुरुषाशी लग्नानंतर आपलं आयुष्य कसं बदललं हे या महिलेने सांगितलं आहे. व्हिक्टोरीया चक्रवर्ती असं या महिलेचं नाव आहे. ती मागील आठ वर्षांपासून भारतात वास्तव्य करते आहे. ती आता एका भारतीय कुटुंबाचा भाग आहे. भारतीय माणसाशी लग्नानंतर आपल्या आयुष्यातल्या गोष्टी कशा बदलल्या हे व्हिक्टोरीयाने सांगितलं आहे.
युक्रेनियन महिलेने काय सांगितलं आहे?
मी भारतीय माणसाशी लग्न केल्यानंतर अगदी कपडे परिधान करण्याच्या पद्धतीपासून अनेक गोष्टी बदलल्या. भारतात खाण्या पिण्याचे विविध पदार्थ मिळतात. शिवाय अनेक सण आणि उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. त्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाले आहेत. पण हे बदल आनंददायी आहेत असंही व्हिक्टोरीया चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
व्हिक्टोरीया यांच्या आयुष्यात कुठले बदल झाले?
१) व्हिक्टोरीया म्हणतात, आता साडी हा माझ्या कपाटातला अविभाज्य भाग झाला आहे. मी कुठल्याही लग्नाला जाण्यापूर्वी किंवा उत्सवात सहभागी होण्यापूर्वी साडीशिवाय दुसरा कुठला विचार करु शकत नाही.
२) भारतात चमचे वापरण्यापेक्षा हाताने जेवण करण्याला अधिक महत्त्व आहे. मलाही आता हातानेच जेवायची सवय लागली आहे. हाताने जेवणं हे खूप छान वाटतं आहे.
३) भारतात साजरे होणारे सण आणि उत्सव मला खूप आवडतात. रंगांपासून प्रकाशाच्या उत्सवापर्यंत अनेक सण वर्षभर साजरे होत असतात. यांमधून खूप सारी सकारात्मकता मिळते.
युक्रेनियन महिला व्हिक्टोरीया यांच्या व्हिडीओवर कमेंटसचा वर्षाव
व्हिक्टोरीया चक्रवर्तींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. लाईक्सचा तर वर्षाव झाला आहे. आत्तापर्यंत व्हिक्टोरीया यांचा हा व्हिडीओ २ लाख ८० हजार लोकांना पाहिला आहे. तसंच लग्नानंतर व्हिक्टोरीया यांचा जो बदलेला लूक आहे तो देखील अनेकांना आवडला आहे. लोकांनी त्यावर कमेंट करुन तुम्ही खूप सुंदर दिसता असंही व्हिक्टोरीया यांना म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
काय आहेत युजर्सच्या प्रतिक्रिया?
एक युजर म्हणतो तुम्ही युक्रेनियन आहात पण भारतीय पद्धतींच्या कपड्यांमध्ये तुमचं सौंदर्य खुलून दिसतं. तुम्ही लवकर लवकर भारतीय पद्धत अवलंबता आहात ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या लग्नात खुश आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. लग्नानंतर तुम्ही साडी नेसलेले जे फोटो पोस्ट करत आहात त्या पोस्टमध्ये तुम्ही सुंदर दिसता असंही युजर्सनी म्हटलं आहे.