Viral Video : वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. वारीमध्ये असंख्य वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात. या वारीमध्ये अनेक दिंड्या असतात. ज्यात वारकरी एकत्र समूह तयार करून पंढरपूरला जातात. दिंडी हा भक्तांचा समूह असतो जो भजन किर्तन आणि विठ्ठलनामाचा जयजयकार करत पंढरपुरच्या दिशेने पायी जातात.

असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी. या वारीमध्ये असंख्य वारकरी तुम्हाला दिसतील. कुणाच्या हातात टाळ आहे तर कुणाच्या डोक्यावर तुळशीचे रोपटे आहे. कुणी विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन पायी जात आहे, तर कुणी या वारकऱ्यांची सेवा करत आहे. कुणी त्यांना मोफत अन्नदान करत आहे, तर कुणी मोफत उपचार करत आहे.

अशातच एका आज्जीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आज्जी वारकऱ्यांना प्रसाद म्हणून शेंगा खाऊ घालत आहे. आज्जीचे हे अन्नदान पाहून नेटकरी भावुक झाले आहे. स्वत: या आज्जीचे वय ८० च्या जवळपास असेल पण तरीसुद्धा ती मनोभावे सेवा देत वारकऱ्यांना शेंगा वाटप करताना दिसते.

हा व्हायरल व्हिडीओ वारीतला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जी दिसेल. जवळपास ८० वर्षाच्या असलेल्या या आज्जीच्या हातात एक पिशवी आहे आणि ती एका जागी उभी आहे. वारीत जाणाऱ्या लोकांना प्रसाद म्हणून शेंगा वाटप करत आहे. आज्जीचा हा दान करणारा भाव पाहून तुम्हीही भावुक व्हाल. आज्जी अतिशय मनोभावे हे दान करताना दिसतेय. माणसात देव शोधणारी ही कदाचित शेवटची पिढी असावी.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

ajinkya_purigosavi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दान नव्हे मोल, दान नव्हे तोल । दान ते अमोल, भाव अंतरीचा ॥
धन संपत्तीचा, गर्व नसावा साचा । भाव भुकेल्याचा, जाणावा आधी ॥
सत्कर्म करावे, निःस्वार्थ भावे । तेणे दुर्मती जावे, शांती लाभावी ॥” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त देण्याची इच्छा असावी, मग देव काय कमी पडू देत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “येवढी मोठी माणसं आहेत या जगात” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे दान पांडुरंगा पर्यंत पोहचले” एक युजर लिहितो, “आजी सारखी मनाची श्रीमंती नेहमी बरी” तर एक युजर लिहितो, “दान करण्यासाठी पैसा नाही तर मन मोठं लागतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आज्जीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.