Reddit Post Of Mumbai Girl About Work From Home: मुंबईत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास अचडणी येत आहेत.

अशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये एका तरुणीने पावसामुळे ऑफिसला जाता येत नसल्याने, आपल्या बॉसला वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी मागितली होती. पण, बॉसने तिला ऑफिसला येण्याची सक्त केली. यावर या तरुणीने बॉसला दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

यायला जमणार नाही…

रेडिटवर ऑफिसच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुणीने लिहिले आहे की, “मी ट्राफिकमध्ये अडकली असून, ऑफिसला पोहचू शकणार नाही.” तरुणीची परिस्थिती न समजता बॉसने यावर रिप्लाय केला की, “असू दे, उशीर झाला तरी चालेल, पण ऑफिसला ये.”

बॉसच्या या रिप्लायनंतर संतापलेल्या या तरुणीने कोणतेही कारण किंवा स्पष्टीकरण न देता बॉसला सांगितले की, “मला ऑफिसला यायला जमणार नाही.”

रेडिटवर तरुणी आणि तिच्या बॉसच्या संभाषणाच्या स्क्रीनशॉटसह एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, “मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे, परंतु या विशिष्ट कार्यालयात असे कोणतेही धोरण नाही.”

इंटरनेटवर व्हायरल पोस्टची जोरदार चर्चा

दरम्यान, या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने उघड केले की, ही तरुणी तिची सहकर्मचारी असून, ती सहाय्यक व्यवस्थापक आहे. तिने बॉसला फोन करून तिची परिस्थिती समजावून सांगितली होती.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिच्या धाडसाचे आणि स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. काहींनी तर बॉसला ठामपणे नकार दिल्याबद्दल तिला सलाम केला, तर काहींनी तिला दबावापुढे झुकण्यास नकार देणारी ‘कॉर्पोरेट बंडखोर’ म्हटले.

यावेळी अनेकांनी मान्य केले की, भारतीय बॉस देशाच्या कोणत्याही भागातील असले तरी त्यांच्यात सहानुभूतीचा अभाव असतो. लोकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणचे भयानक अनुभवही शेअर केले. एका युजरने, त्याला मुसळधार पावसात बंद पडलेल्या बाईकसह अडकल्याचे आणि घरून काम करण्यास नकार देणाऱ्या बॉसला तोंड द्यावे लागल्याची आठवण सांगितली.