Viral Video: संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू असून, आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. त्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवास केला जातो. तसेच देवीला प्रिय असलेल्या मंत्र आणि स्तोत्रांचे पठण केले जाते. परंतु, तुम्हाला माहितेय का? देवीला व्रत, पूजा, आराधना, मंत्र-स्तोत्रांच्या पठणासह आणखी एक गोष्ट खूप आवडते आणि ती म्हणजे शृंगार…, हो शास्त्रात देवीला १६ शृंगार करण्याचे महत्त्व सांगितले जाते. हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार देवीला शृंगार अत्यंत प्रिय असून, देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक देवीच्या ओटीसह शृंगार साहित्यदेखील आवर्जून अर्पण करतात.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर देवीआईच्या विविध रूपांचे फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यातील देवीचे मनमोहक सुंदर रूप पाहून मन प्रसन्न होते. याचदरम्यान, सध्या असा समोर एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, ज्यात एक मेकअप आर्टिस्ट देवीचा शृंगार करताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मेकअप आर्टिस्ट देवीला वंदन करून, तिचा साजशृंगार करण्यास सुरुवात करतो. सुरुवातीला तो देवी आईला निळ्या रंगाची सुंदर साडी नेसवून, त्यानंतर तिचे केस विंचरतो. पुढे तो देवीला एकापेक्षा एक सुंदर दागिने घालतो आणि नंतर देवीला फुलांचा सुंदर हार घालून, देवीच्या मनमोहक रूपाची आरती केली जाते. आईच्या शृंगाराचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @viraj_patil_makeup_and_hair या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “सकाळ व्हावी, मोबाईल हातात घेतला का पहिला हा व्हिडीओ समोर यावा; अजून काय हवं….” दुसऱ्याने लिहिलेय, “सकाळची पहिली झलक… मोबाईल हातात घेताच देवीचं अप्रतिम रूप दर्शन”, तिसऱ्याने लिहिलेय की, आपण साडीत गुंफलेली प्रत्येक घडी-ओवी देवीच्या रूपात सौंदर्य, शौर्य व मातृत्वाची लय घेऊन येते, खूपच सुंदर.”