Agra Wedding Celebration Accident Video Viral : रस्ते अपघातात रोज अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. कधी स्वत:च्या चुकीने तर कधी समोरच्या वाहनचालकाच्या चुकीने हे अपघात घडतात, त्यामुळे रस्त्यावरून चालतानाही सावधगिरी बाळगा असे सांगितले जाते; कारण अनेकदा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून चालणाऱ्यांना चिरडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा अपघातांमध्ये चूक नसतानाही निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. अशाचप्रकारच्या एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, ज्यात व्हॅनवरील नियंत्रण सुटल्यानं भयंकर अपघात झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, एवढा भयानक हा अपघात आहे.

व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावरून लग्नाची वरात जात आहे. यावेळी वऱ्हाडी संगीत आणि ढोलच्या तालावर नाचण्याचा आनंद घेत आहेत. विशेषत: महिला मस्त सजून-धजून नाचतायत. त्यांच्याबरोबर लहान मुलं मुलीही नाचतायत. ढोल- ताशांच्या आवजाने एकूण उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, हेच आनंदी वातावरण क्षणात शोकाकूल वातावरणात बदलते. कारण नियंत्रण सुटल्याने एक भरधाव इको व्हॅन लग्नाच्या वरातीत घुसते, व्हॅनचा वेग इतका जास्त होता की, कोणालाही पळण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे व्हॅन थेट रस्त्यावरील वरातीत नाचणाऱ्या महिलांना चिरडत नेते. कॅमेऱ्यात कैद झालेले अपघाताचे हे दृश्य इतके भयानक आहे की, व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांच्या काळजात धस्स होईल.

व्हॅनच्या धडकेत महिला जमिनीवर कोसळतात; यानंतर सरळ त्यांच्या अंगावर ती व्हॅन जाते. हे दृश्य पाहून उपस्थित असलेले लोकही खूप घाबरतात आणि जोरजोरात ओरडू लागतात, यामुळे क्षणात सर्व आनंदाचे वातावरण दु:खात बदलते. सर्वत्र गोंधळ आणि भयानक स्थिती निर्माण होते.

हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी अनेकांनी व्हिडीओला लाईकदेखील केले आहे. दरम्यान, ही घटना फार भयानक असल्याचे म्हणत लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

एका युजरने लिहिले की, रस्त्यावर नाचण्यावर बंदी घालावी आणि कार चालकाचा परवाना आयुष्यभरासाठी रद्द करावा. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा अपघात खूप वेदनादायक आहे. तिसऱ्याने लिहिले की, कारचालक एकतर आंधळा होता किंवा मद्यधूंद होता.