पाकिस्तानमध्ये ऊर्जा वाचवण्याच्या उद्देशाने लग्नांवर निर्बंध आणण्याच्या निर्णय सरकारने घेतलाय. इस्लामाबादमध्ये रात्री १० वाजल्यानंतर लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आलीय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी सरकारने यासंदर्भातील निर्बंध जारी केलेत. सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरांबरोबरच वीजेचे दरही झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच वीजेचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्बंध लादण्यात आलेत.
नक्की वाचा >> विश्लेषण: २०० रुपयांना पेट्रोल, रिकामे ATM अन्… चिनी कर्जामुळे पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेने; परिस्थिती चिघळण्याची कारणं कोणती?
आठ जूनपासून अंमलबजावणीला सुरुवात
पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे येथे ऊर्जासंकटही निर्माण झालंय. त्यामुळेच जास्तीत जास्त ऊर्जा वाचवण्याच्या उद्देशाने सरकारने काही निर्बंध लादले आहेत. वीजेचा वापर कमी व्हावा या उद्देशाने मोठ्या समारंभांवर रात्री १० नंतर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बुधवारी म्हणजेच ७ जून २०२२ रोजी हा निर्णय घेण्यात आल्यानंतर ८ जून पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. इस्लामाबाद शहरासाठीच सध्या हा नियम लागू करण्यात आला असला तरी भविष्यातील ऊर्जेसंदर्भातील संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांमध्येही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
पंतप्रधानांनीच दिले आदेश
‘द डेली टाइम्स’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या आदेशानुसार देशाच्या राजधानीमध्ये लग्नसोहळ्यांवर निर्बंध लादण्यात आलेत. इस्लामाबाद पोलीस आणि शहरातील महानगरपालिकेला या निर्बंधांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी होईल यासंदर्भात काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार आहे. जीओ न्यूजनेही यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वीजेचे दरही वाढणार
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सरकारी वीज कंपनीने एक जूनपासून वीजेचे दर प्रती युनीटमागे ७.९ रुपयांनी वाढवलेत. एकूण १२ रुपये प्रती युनीट दरवाढ होणं अपेक्षित असून पुढील पाच रुपये हे अनुदान बंद करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्यात वाढवले जाण्याची शक्यता आहे. मागील महिन्यामध्येही पाकिस्तानमधील वीजेचे दर ४.८० रुपये प्रती युनीटने वाढले होते. मागील काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये गॅस आणि कोळशापासून निर्माण होणारी वीजनिर्मिती थांबवण्यात आलेली. ऐन उन्हाळ्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याने लोकांना भारनियमानाचा सामना करावा लागला.
कामाचे दिवस कमी करुन इंधन बचतीचा प्रयत्न
पाकिस्तानमधील आर्थिक संकट श्रीलंकेप्रमाणेच दिवसोंदिवस गंभीर होत चाललंय. मार्च २०२३ पर्यंत पाकिस्तानला २० अब्ज डॉसर्सचं परदेशी कर्ज फेडावं लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार हे पाकिस्तानसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे. पाकिस्तानमधील परिस्थितीचा अंदाज यावरुनच येईल की सरकार आता कामाचे दिवस कमी करुन इंधनाची बचत करण्याचा प्रयत्न करत आहे. असं केल्याने वर्षभरामध्ये पाकिस्तानला २.७ अब्ज डॉलर्सचं परदेशी चलन वाचवता येईल असा दावा केला जातोय.