सोशल मीडियावर आपणाला असे काही व्हिडिओही पाहायला मिळतात, जे पुन्हा पुन्हा बघावे वाटतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो आई आणि तिच्या मुलाशी संबंधित आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा खेळता खेळता पायऱ्यांवरून खाली पडतो, मात्र सुदैवाने त्याच्या आईची नजर मुलावर जाते आणि त्यानंतर आईने आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाचवले आहे ते दृश्य आश्चर्यचकित करणारे आहे. ही संपुर्ण थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण मुलाच्या आईचं कौतुक करत आहेत.
मुलाला वाचवण्यासाठी आईची धडपड –
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासह लिफ्टमधून बाहेर आल्याच दिसत आहे. ती एका मजल्यावर थांबते तिथे तिचे ऑफिस असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय या मजल्यावरुन खाली जाण्यासाठी काही अंतरावर पायऱ्या असल्याचं दिसत आहे. लहान मुलगा खेळता खेळता या पायऱ्यांजवळ जातो आणि अचानक तो खाली कोसळणार इतक्यात त्याच्या आईची नजर मुलावर जाते.
मुलगा खाली पडणार तोच आई उडी मारून त्याचा पाय पकडते. यावेळी या महिलेने मुलाचा पाय ज्या पद्धतीने आणि काळजीने धरला आहे, ते दृश्य थक्क करणारं आहे. शिवाय काही क्षणात या ठिकाणी इतर लोक जमा होतात आणि मुलाला सुखरुप वर घेतात.
या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत. तर @OTerrifying नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आईच्या अविश्वसनीय सजगता पाहा, ती आपल्या मुलाला पायऱ्यांवरून पडण्यापासून वाचवते.” हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणआत व्हायरल होत असून तो १८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेक नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी यालाच आईची माया म्हणतात अशा कमेंट केल्या आहेत.