World No Tabaco Day 2022 Kerala Man Gets Bigger Home With Money Saved After Giving Up Smoking: सिगारेट तसेच तंबाखुचे व्यसन आरोग्यासाठी हानीकारक असते. तसेच तंबाखू असो किंवा सिगारेट असो त्यांचे व्यसन सोडल्याने आरोग्याला भरपूर फायदा होतो असं तंबाखू आणि धुम्रपानासंदर्भात जनजागृतीच्या जाहिरातींमध्ये सांगितले जाते. त्यात आजच्या दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी अशाप्रकारच्या संदेशांचा तर पाऊस पडतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ३१ मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवस देशाबरोबरच देशाबाहेर म्हणजेच जागति स्तरावर तंबाखूविरोधी रॅली, पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून जागृती केली जाते. मात्र तंबाखू तसेच धुम्रपान सोडल्याने केवळ आरोग्यविषय फायदा होतो असं नाही तर त्यामधून त्या व्यसनांवर खर्च होणारा पैसाही मोठ्याप्रमाणात वाचतो. अशाचप्रकारे धुम्रपान सोडल्याने केरळमधील एका व्यक्तीला एवढा आर्थिक फायदा आणि बचत झाली की त्याने सिगारेटवर खर्च होणाऱ्या पैशांमधून चक्क मोठ्या घर बांधण्याचं आपलं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोझीकोडे येथे राहणाऱ्या वेणूगोपालन नायर यांच्या या अनोख्या बचतीचं वृत्त २०२० मध्ये सर्वात आधी समोर आलं होतं. आजच्या तारखेनुसार त्यांनी साधारण १० वर्षांपूर्वी सिगारेट सोडली. सिगारेटचं त्यांना एवढं व्यसन होतं की त्यांच्याकडील बराचसा पैसा हा या व्यसनावर खर्च व्हायचा. मात्र एकदा आरोग्य तपासणीनी केल्यानंतर त्यांनी २०१२ साली सिगारेट सोडली. या निर्णयाचा त्यांच्या आरोग्याला तर फायदा झालाच शिवाय यातून त्यांना मोठा आर्थिक फायदाही झाला.

सिगारेट सोडल्यापासून १०० महिन्यांमध्ये (८ वर्ष ४ महिने) वेणूगोपालन यांन पाच लाख रुपयांची बचत केली आहे. त्यांनी सिगारेट सोडली नसती तर हे पैसेही सिगारेटवरच खर्च झाले असते. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेणूगोपालन यांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने बचत करण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि दोन मुलांचा विचार करुन त्यांनी सिगारेट सोडल्यानंतरही रोज सिगारेटसाठी खर्च होणारे पैसे बाजूला काढण्यास सुरुवात केली. तरुण वयामध्ये सिगारेटचे व्यसन लागल्याने त्यांच्या आरोग्यावर या व्यसनाचे गंभीर परिणाम दिसू लागल्याचे त्यांना वयाच्या ६५ व्या वर्षानंतर जाणवू लागले. “मी वयाच्या १३ व्या वर्षांपासूनच लपूनछपून धुम्रपान करुन लागलो. आधी मी बिडी ओढायचो. चार आण्याला मला तीन बिड्या मिळायच्या. ६७ व्या वर्षापर्यंत धुम्रपान करत राहिल्याचे गंभीर परिणाम माझ्या प्रकृतीवर दिसण्यास सुरुवात झाली. मला छातीत दुखू लागल्यानंतर मी काही चाचण्या केल्या आणि सिगारेट सोडली, त्यामुळेच आज मी जिवंत आहे,” असं वेणूगोपालन यांनी २०२० साली घराचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.

छातीसंबंधित आजारामुळे वेणूगोपालन यांनी सिगारेट सोडून दिली. ५० रुपयांना एक पाकीट याप्रमाणे व्यसनी व्यक्ती दिवसाला २० सिगारेट म्हटलं तरी १०० रुपये धुम्रपानाच्या व्यसनावरच खर्च करतो, असं गाणित मांडता येईल. सिगारेट सोडल्यामुळे वेणूगोपालन यांचा खर्च कमी झाला आणि ते सिगारेटवर रोज खर्च होणारे पैसे बाजूला काढून ठेऊ लागले. याच पैशांमधून त्यांना २०२० साली स्वत:च्या घरावर आणखीन एक मजला बांधला. त्यामुळे त्यांनी बचत म्हणून बाजूला काढलेले पाच लाख वापरुन त्यांनी घराच्या वरच्या मजल्याचे काम करुन घेतलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World no tobaco day 2022 kerala man gets bigger home with rs 5 lakh he saved after he quit smoking scsg