रोजच्या रुटीनला आणि कामाला आपण अनेकदा वैतागतो. मग ही नोकरी सोडून द्यावी आणि आपल्या आवडीचे आणि क्रिएटीव्ह काहीतरी काम करावे असा विचारही आपल्या मनात येतो. ज्यामध्ये आपले मन रमेल आणि चांगला पैसाही मिळेल असे काम आपण कायमच शोधत असतो. पण असे काम आयुष्याच्या योग्य टप्प्यावर मिळेलच असे नाही. अशाच कामाचा शोध घेत असताना ३५ वर्षीय नतालिए गोमेजला अचानक एक कल्पना सुचली. विशेष म्हणजे आपल्याला सुचलेल्या या कल्पनेतून चांगला व्यवसाय होऊ शकतो असे वाटल्याने तिने त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले.
इंटरनेटवर सर्फिंग करत असताना नतालिएला आपल्याला घरबसल्या ऑनलाइन वस्तू आणि कपडे विकता येऊ शकतात असे समजले. १५ डॉलरहून अधिक किंमतीच्या वस्तू इंटरनेटव्दारे विकल्यास त्यामध्ये आपल्याला २० टक्के कमिशन मिळत असल्याचे तिला चौकशीनंतर समजले. तिने त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले आणि अवघ्या काही दिवसांतच आपण योग्य दिशेने चाललो असल्याचे तिच्या लक्षात आले. अपयशा ही संधी मानत नतालिएने शोधलेली कल्पना आणि त्यातून तिला मिळालेली दिशा खऱ्या अर्थाने तिचे आयुष्य बदलवणारी ठरली.
विशेष म्हणजे कोणतीही पार्श्वभूमी नसताना केलेल्या या विक्रीतून नतालिएला ४० डॉलर म्हणजेच २,५०० हून अधिक रुपयांची कमाई झाली. आपला हा व्यवसाय वाढविण्यासाठी तिने वेगवेगळे प्रयोग सुरु केले आणि घरुनच जुने कपडे विकण्यास सुरुवात केली. ‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, तिची पहिल्या महिन्यात सुमारे साडे सहा लाख रूपयांची विक्री झाली. यानंतर आठ महिन्यातच तिने स्वतःचे ऑनलाईन स्टोअर सुरू केले. या उद्योगात स्थिरावलेल्या नतालिएने जवळपास २ वर्षांत सुमारे १ लाख डॉलर म्हणजेच ६५ लाख रूपये कमावले. आता ती महिन्याला सुमारे ३ लाख रूपये कमावते. सध्या ऑनलाइन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला असल्याने आपल्या या ऑनलाइन खरेदी-विक्रीला तरुण आणि इतर वयोगटाकडूनही चांगला प्रसिताद असल्याचे ती सांगते.
