उंची हॉटेलमध्ये तेदेखील ताजसारख्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं ही एक आगळीवेगळी गोष्ट ठरते. अनेकदा हा एखाद्या स्वप्नपूर्तीचाही आनंद असतो. मात्र अशा हॉटेल्समध्ये कसं वागायचं, काय परिधान करायचं याचे काही नियम असतात आणि त्यावरुन अपमान होऊ शकतो असं म्हटलं तर? होय सोशल मीडियावर ताज हॉटेलमध्ये घडलेल्या एका प्रकारावरुन चांगलीच चर्चा आणि वादविवाद सुरु झाले आहेत. ही घटना आहे दिल्लीतल्या ताजची. युअर स्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे.

युअर स्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी काय म्हटलं आहे?

श्रद्धा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. ‘एक सामान्य माणूस जो कठोर परिश्रम करतो, स्वतःचे पैसे कमवतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह हॉटेलमध्ये येतो, त्याला या देशात अजूनही अपमान आणि अपमान सहन करावा लागतो,” असं श्रद्धा शर्मा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या,”माझी चूक काय आहे? मी फक्त नियमित पद्मासन शैलीत मांडी घालून बसले ही चूक असू शकते?” मी माझ्या बहिणीसोबत दिवाळीनिमित्त जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी हा प्रसंग घडला आहे. फाइन डायनिंगचा नेहमीच एक शांत नियम राहिला आहे, कसे कपडे घालावे, कसे वागावे आणि कसे बसावे. परंतु विविध क्षेत्रातील भारतीय लक्झरी रेस्तराँमध्ये प्रवेश करत असताना, या जुन्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. यावर सोशल मीडियावरूनही टीका केली जात आहे. मी इथे आले आहे, बिल भरणार आहे मग मला हे सगळं का शिकवलं जातं आहे? शिवाय माझा अपमान का केला जातो आहे? असाही प्रश्न श्रद्धा शर्मा यांनी विचारला आहे. दरम्यान या व्हिडीओनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत?

श्रद्धा शर्मा यांच्या व्हिडीओबाबत एक युजर म्हणतो तुम्ही ताज मध्ये जेवायला गेला आहात. तिथे वागण्याचे काही संकेत आहेत. कपडे परिधान करण्याचे संकेत आहेत. ते तुम्ही पाळायला नको का? तुमच्याकडे ताजचं बिल भरायला पैसे आहेत पण साधे शिष्टाचार पाळण्याची समज नाही. ताज मधे गेला आहात तुमच्या घराच्या सोफ्यावर बसून जेवण करत नाही आहात की हव्या तशा बसाल आणि वरुन असं बसलं तर काय होतं विचाराल. दुसरा एक युजर म्हणाला मला वाटतं श्रद्धा शर्मा यांना शिष्टाचार काय असतात ते शिकण्याची गरज आहे. त्यांना ते माहीत असते तर त्या असं वागल्या नसत्या. तुमचा कम्फर्ट आणि रेस्तराँचा दर्जा याची तुलना कशी काय होईल? दरम्यान काही युजर्सनी श्रद्धा शर्मा यांची बाजूही घेतली आहे. श्रद्धा यांनी कसं बसायचं आणि कसं खायचं हे सांगणारं हॉटेल प्रशासन कोण? असा सवाल काही युजर्सनी केलाय. तसंच शिल्पा शेट्टीसह अनेक असे सेलिब्रिटी आहेत जे हाताने जेवण करणं पसंत करतात. मग श्रद्धा शर्माने तसं जेवल्यास हरकत काय? असेही प्रश्न काहींनी उपस्थित केले आहेत.