X
X

पाऊलखुणा..

READ IN APP

प्रथमग्रासे मक्षिकापाते, या न्यायाने त्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला.

मोरूने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जायला नकार दिल्याने, प्रथमग्रासे मक्षिकापाते, या न्यायाने त्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गेला आठवडा, नोकरीच्या वेळा सांभाळत मोरूच्या आईबाबांनी मोरूच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यात घालवला. त्याला छान रंगीबेरंगी दप्तर आणलं. पाणी पिण्याची छोटीशी बाटली आणली. पेन्सिली आणि खोडरबरं ठेवायला छोटीची कंपास बॉक्सही आणली. मोरू पावसात भिजणार आणि मग त्याला सर्दी होणार, परिणामी शाळा बुडणार, या भीतीने आईबाबांनी रेनकोट आणायला दुकानाच्या रांगेत बराच वेळ घालवला. रांगेत प्लास्टिकबंदी हाच विषय पालक चघळत होते. मग रेनकोट प्लास्टिकचा घ्यायचा की रेक्झिनचा, यावरून मोरूच्या आईबाबांची रांगेतच भांडणंही लागली. पण त्याला शाळेत जायचंच नव्हतं. शाळेत खूप मज्जा असते, असं सगळ्यांनी सांगूनही, त्यावर त्याचा विश्वास काही बसत नव्हता. पण शाळेत तर जावंच लागणार होतं. त्यासाठी आईचा धपाटाही खावाच लागणार होता. शाळेच्या दारात पोहोचेपर्यंत मोरूच्या पोटात धाकधूक होती. शाळेतले मास्तर, नव्हे टीचर मारकुटे तर नसतील ना, अभ्यास खूप असेल की खेळ, आपल्या गल्लीतले आपले मित्रच आपल्या वर्गात असतील ना.. अशा नाना प्रश्नांनी त्याच्या इवलुश्या मेंदूचा पार भुगा व्हायला लागला होता. शाळेच्या दारातच तोरणं उभारली होती. मंगल वाद्य वाजत होती. एखाद्या समारंभात शोभेलसं हे वातावरण पाहून मोरूसारखे सगळेच जण भांबावून न जाते तरच नवल. शाळेत आलोय की कुणाच्या लग्नाला, असा संभ्रम निर्माण होईपर्यंत आईबाबांनी मोरूला टीचरच्या ताब्यात देऊनही टाकलं. बरीच मुलं भोकाड पसरून रडत होती. काही जण घाबरली होती. काहींना काहीच कळत नव्हतं. मोरू भिजक्या चेहऱ्यानं शाळेत प्रवेशता झाला. जगण्यातलं तोवर असलेलं सगळं स्वातंत्र्य आता संपलं आहे, मरेपर्यंत आता फक्त परीक्षाच द्याव्या लागणार आहेत, हे त्या छोटय़ाश्या जिवाला कुठून कळणार? आता आयुष्यभर ताणाखालीच जगायचं आहे, हे कळण्याएवढाही मोरू मोठा झालेला नव्हता. आईबाबांना मनोमन हे कळत असलं, तरी त्यांचा नाइलाज होता. त्याची छोटीशी पावलं शाळेतच पडायला हवीत, यावर ते ठाम होते. मोरूच्या टीचरनी सगळ्या मुलांचा ताबा घेतला आणि हुश्श करत आईबाबाही घराकडे परतले.

शाळा सुरू होऊन काही वेळातच सुटणार असली, तरीही पहिला दिवस आणि मोरूचं जीवनामधलं शाळेतलं पहिलं पाऊल स्मरणयात्रेत जपून ठेवायलाच हवं, म्हणून शाळेनं नामी युक्ती शोधली. प्रत्येक मुलाला आणि मुलीला तिचं एक पाऊल कुंकवाच्या पाण्यात बुडवून एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर ठेवायला सांगितलं गेलं. मुलांच्या रांगेत एकच गलबला झाला. प्रत्येकानं पाऊल कागदावर ठेवलं, की त्यावर त्या मुलाचं नाव लिहिण्यासाठी टीचरची केवढी तरी तारांबळ उडू लागली.  शालेय जीवनातील हे पहिलं पाऊल जपण्यासाठीचा हा आटापिटा नेमका कशासाठी, हे मोरूसकट कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. मग कुणीतरी मुलांची नखं कापली, कुणीतरी त्याच्या केसांचे नमुने घेतले, हातांचेही ठसे घेतले. हे सारे मोरूच्या शालेय प्रवेशाचे पुरावे होते. ते त्याने अखेपर्यंत जपून ठेवायचे आहेत म्हणे! कुंकवात बुडवलेला एक लाल पाय घेऊन घरी गेल्यावर पुन्हा सकाळसारखाच आणखी एक धपाटा खावा लागेल की काय? या चिंतेनं मोरूच्या अंगावर शहारे आले मात्र!

22
X