सध्या करोनामुळे शाळा, कॉजेस बंद असली तरी व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. मात्र हे व्हिडिओ लेक्चर्स घेताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अगदी नवीन गोष्टी शिकण्यापासून ते तांत्रिक अडचणींवर मात करुन शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देत आहेत. असं असतानाच काही ठिकाणी मात्र व्हिडिओ लेक्चर्सदरम्यानही टवाळक्या करुन शिक्षकांना खास करुन वयस्कर शिक्षकांना विद्यार्थी त्रास देत असल्याचे समोर आलं आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर याविरोधात आवाज उठवणाऱ्यांनी सोशल मिडियावरुन टवाळखोरांना चांगलं फैलावर घेतलं आहे. एकीकडे वयस्कर प्राध्यापक आणि शिक्षक जीव तोडून शिकवण्याचा प्रयत्न करत असताना टवळखोरांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक पोस्ट सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवरील टेड तर स्टोनर नावाच्या अकाउंटवरुन एका ५५ वर्षीय प्राध्यापकाच्या झूम लेक्चरदरम्यानचा स्क्रीनशॉर्ट शेअऱ करण्यात आला आहे. या फोटोबरोबर शेअऱ करण्यात आलेल्या मजकुरामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मस्करी करणे कशापद्धतीने चुकीचे असून ते विद्यार्थ्यांसाठी काय काय करत आहे यासंदर्भातील भावनिक पण वास्तवदर्शी मुद्दे मांडण्यात आले आहेत.

या पोस्टमध्ये झूम कॉलवरुन विद्यार्थ्यांना लेक्चर देताना फळ्याजवळ उभ्या असलेल्या प्राध्यापकांचा फोटो दिसत आहे. “ही पोस्ट नक्कीच वाचा, शेअर करा, समजून घ्या, अंमलात आणा. त्यांना ट्रोल करणं गरजेचं नाही. तुम्ही एखाद्याला न दुखावता विनोदबुद्धी दाखवू शकता,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. करोना लॉकडाउनमुळे आलेल्या अनपेक्षित संकटामुळे आपल्याप्रमाणे शिक्षकांसमोरही कशापद्धतीने अडचणी निर्माण झाल्या आहेत हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. करोना साथीच्या काळात शिकवण्याचा पद्धतीने कशाप्रकारे बदल झाला आहे यासंदर्भात पोस्टमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. करोनामुळे शिक्षकांवर खूप ताण असून अशा परिस्थितीमध्येही ते सर्वोत्तम प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोस्टमधून नमूद केलं आहे.

“मुख्यध्यापकांनी अचानक ५५ वर्षीय प्राध्यापकांना ऑनलाइन वर्ग कसे घ्यावेत हे शिकून घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांना काहीच बोलता आलं नाही कारण नकार दिला तर नोकरी जाईल हे त्यांना समजलं होतं. या परिस्थितीमध्ये आणि या वयामध्ये दुसरं कोणतं काम आपल्याला जमणार नाही याची त्यांना जाणीव आहे. कुटुंबासाठी त्यांना हे करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता,” असं या पोस्टच्या सुरुवातीला लिहिण्यात आलं आहे.

मुलीची मदत घेण्यापासून ते ते महागडा फळा विकत घेण्यापर्यंत आणि नवीन शर्ट घालून तयार होऊन लेक्चरला उभं राहण्यापर्यंत अनेक गोष्टींचा या पोस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. एक लेक्चर घेण्यासाठी शिक्षकांना काय काय करावं लागतं यासंदर्भात पोस्टमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “पुढच्या दिवशी त्यांनी नवीन शर्ट घातलं कारण ते त्यांच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ दीड महिन्यानंतर पहिल्यांदा भेटणार होते. त्यांच्या मुलीने त्यांना स्मार्टफोन आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करुन लेक्चरी पूर्वतयारी करुन दिली. त्यांना थोडी भिती वाटत होती. त्यांचा आवाज थोडा कातरल्यासारख्या झाला होता. ते थोडे अस्वस्थ होते मात्र त्यांच्याकडे पर्याय नव्हता,” अशा शब्दांमध्ये त्या शिक्षकाची काय अवस्था झाली होती हे मांडण्यात आलं आहे.

“अचानक एका अनोळखी आयडीवरुन त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. शिव्या देण्यात आल्या. यावर कसे व्यक्त व्हावे हे त्यांना कळेना. ते जोरात ओरडले आणि त्यांना अस्वस्थही वाटू लागलं. एका शिक्षकाचा त्याच्या विद्यार्थ्यांसमोरच अपमान झाला होता. आयुष्यभर कमावेलेली इज्जत काही सेकंदांमध्ये हरवून बसल्यासारखं त्यांना झाला. त्यांच्या मुलीने त्यांना विद्यार्थ्यांना म्युटवर टाकण्याचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला. मात्र विद्यार्थ्यी स्वत:ला अनम्युट करु शकत होता. तो शिव्या देतच राहिला. तो इतरांना मज्जा येईल त्यांचे मनोरंजन होईल म्हणून हे करत होता. त्यामुळे प्राध्यापकाला लेक्चर संपवावं लागलं कारण अर्थात त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता,” असं पोस्टच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये लिहिण्यात आलं आहे.

२४ तासांच्या आत तीन लाख ३१ हजारहून अधिक जणांनी ही पोस्ट लाइक केली आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 55 year old teacher gets bullied during online class heartbreaking viral post talks about his ordeal scsg