क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. या खेळात एखादा फलंदाज तुफान धावा करतो तर एखादा फलंदाज सातत्याने अपयशी ठरतो. एखादा गोलंदाजाला बराच मार पडतो तर दुसरा एखादा गोलंदाज सर्वांच्या लक्षात राहिल अशी कामगिरी करून जातो. अशीच एक सर्वोत्तम कामगिरी १७ वर्षांपूर्वी पाकिस्तानतच्या महिला गोलंदाजाने करून दाखवली. साजिदा खान हिने एक वन डे सामन्यात केवळ ४ धावा देत तब्बल ७ गडी तंबूत धाडले. तिने ८ षटके टाकली. त्यापैकी ५ षटके निर्धाव (मेडन) होती. साजिदा शाह हिने केलेली कामगिरी अजूनपर्यंत महिला वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

२१ जुलै २००३ ला पाकिस्तान विरूद्ध जपान असा सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर किरण बलुच (३१) आणि कर्णधार शाइझा खान (३०) यांनी चांगली खेळी केली होती. नाझीया नाझिर हिनेही २४ धावा केल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यात तब्बल ५४ धावा अवांतर पद्धतीच्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या ५० षटकात ६ बाद १८१ अशी झाली होती.

१८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जपानच्या महिला संघाची दाणादाण उडाली होती. संघातील एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठणे शक्य झालेले नव्हते. दोनही सलामीवीर प्रत्येकी ३-३ धावांवर बाद झाले होते. तीच त्यांच्या डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. सात खेळाडूंना आपले धावांचे खातेही उघडता आले नव्हते. या डावातही २० धावा अवांतर पद्धतीच्या होत्या. त्यामुळे जपानचा डाव २८ धावांवर आटोपला. साजिदा शाहने ७ बळी टिपले तर खुर्शीद जाबिन हिनेही १० षटकांपैकी ८ षटके निर्धाव टाकत २ धावांत ३ खेळाडू माघारी धाडले.