समाजाचे कप्पेबंद उतरंडप्रधान वर्गीकरण प्रवर्तित करणारी ‘चातुर्वण्र्य’ ही निव्वळ धार्मिक-सामाजिक बाब होय, असे मानणे हा घाऊक बाळबोधपणाच शाबीत व्हावा. व्यवहारत: चातुर्वण्र्याचे स्वरूप व्यवस्थात्मक दिसत-भासत असले तरी ती मुळात आहे एक प्रवृत्ती. साहजिकच, जीवनव्यवहाराचे एकही क्षेत्र तिच्या फैलावापासून अस्पर्शित राहणे सर्वथैव असंभवच. संशोधनाच्या क्षेत्रातही ‘सैद्धान्तिक संशोधन’ आणि ‘उपयोजित संशोधन’ असे द्वैत जपले-जोपासले जाते. चातुर्वण्र्याचा हा होय अकादमिक अवतार! उपयोजित संशोधन करणाऱ्यांची पाने सैद्धान्तिक संशोधकांच्या पंगतीमध्ये मांडली जातात आडवी. तर, ‘हस्तिदंती मनोऱ्यातील पढीक विद्वान’ म्हणून उपयोजित संशोधनाच्या क्षेत्रातील लोक संभावना करतात सैद्धान्तिक संशोधनाला वाहून घेतलेल्यांची. मुदलात, हे द्वैतच होय कमालीचे भ्रामक आणि निखळ कल्पनाजन्य. कोणत्याही शास्त्रातील सिद्धान्तांची पायाभरणी घडून येत असते वास्तव जीवनानुभवांद्वारेच. व्यावहारिक जीवनाशी विसंवादी असणारे कोणतेही सैद्धान्तिक प्रारूप, मग ते कितीही आटीव-बांधीव का असेना, सपशेल झिडकारले जाते. किंबहुना, कोणतेही प्रारूप अथवा प्रमेय जोवर रोकड्या जीवनव्यवहाराशी सुसंगत ठरत नाही तोवर ‘सिद्धान्तन’ ही मान्यता मिळत नाही त्याला. ही कळ अचूक हेरलेली भागवतधर्मी संतमंडळातील जाज्ज्वल्य विभूती मुक्ताबाईंनी. ‘अष्टांगयोगामध्ये पारंगत हस्ती म्हणजे योगी’ ही ‘योगी’ या संकल्पनेची सैद्धान्तिक व्याख्या. ‘योग’ आणि ‘योगी’ या संकल्पनांना अनंत छटा आहेत. नाथरायांनी ‘एकनाथी भागवता’च्या आठव्या अध्यायात योग्याची लक्षणे मांडलेली सापडतात. समत्व हे अवघ्या योगाचे सार होय, हे इंगित हस्तगत झालेला योगी आवडीं प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो । ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र या तत्वाला अनुसरून जीवन व्यतीत करतो, हे नाथांचे कथन योग्याने त्याच्या अस्तित्त्वात जिरविलेले समतेचे सूत्र अधोरेखित करते. लोकरहाटीमध्ये वर्णावर्ण, जातपात, या दोहोंच्या आधारे साकारणारी श्रेष्ठ-कनिष्ठ भावाची उतरंड अशा वृत्ती-व्यवस्थांचे जंजाळ माजलेले असले तरी योगी स्वत:ला त्यांपासून पूर्णत: अलिप्त राखतो, असा नाथांचा निरपवाद निर्वाळाच होय. तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण। देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडीं हे नाथांचे उद्गार त्याच वास्तवाचे द्योतक होत. परंतु, इथे एक मोठी गंमत आहे. योगी व्यक्तीची अंगभूत लक्षणे नाथराय विश्लेषून सांगतात हे खरेच. परंतु, अशा व्यक्तीच्या ‘योगी’पणाची कसोटी कशी व कोठे सिद्ध करायची, हा प्रश्न उद्भवतोच इथे. प्रयोगशाळेतील बंदिस्त, नियंत्रित पर्यावरणामध्ये सिद्धीस गेलेली एखादी चाचणी खुल्या व्यवहारातील धकाधकीच्या, अ-नियंत्रित परिस्थितीजन्य ताणतणावांना पुरून उरेल, याची हमी तिचे क्षेत्रीय परीक्षण केल्याखेरीज कशी मिळावी? लोकसंपर्कापासून नेहमी अलिप्त राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या योग्याच्या अंत:करणाला द्वंद्व-द्वैताचा उपसर्ग होत नसेल तर, एका अर्थाने, ते स्वाभाविकच नव्हे का? अशा योग्याच्या ‘योगी’पणाची काटेकोर कसोटी लागते ती द्वैत-दंभाने अंतर्बाह्य नटलेल्या लोकव्यवहारामध्येच. योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा अशी ती कठोर क्षेत्रीय चाचणी मुक्ताबाई सिद्ध करतात ती ‘सैद्धान्तिक’ आणि ‘उपयोजित’ यांतील मर्मभेद अचूक कळल्यामुळेच.
– अभय टिळक
agtilak@gmail.com
