लॉकडाउनमुळे देशवासियांची अवस्था फारच बिकट झाली आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशीच काहीशी अवस्था कलाकार मंडळींची देखील झाली आहे. टीव्ही अभिनेत्री सोनम वेंगुर्लेकर आर्थिक टंचाईमुळे त्रस्त आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत तिला एका मेकअप मॅनने मदतीचा हात पुढे केला आहे.

सोनमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन हा संपूर्ण किस्सा आपल्या चाहत्यांना सांगितला.

“लॉकडाउनमुळे माझं आर्थिक नुकसान झालं आहे. माझ्या कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी पुढचा महिना कसा काढायचा हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत माझा मेकअप मॅन मदतीला धावून आला. त्याने मला १५ हजार रुपये देउ केले आहेत. त्याची बायको गरोदर आहे. तो स्वत: देखील आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. मात्र त्याने मला मदतीचा हात पुढे केला.” अशा आशयाची भावनीक पोस्ट सोनमने केली आहे.

सोनम वेंगुर्लेकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘आर के लक्ष्मण की दुनिया’, ‘साम दाम दंड भेद’, ‘तेरे नाल इश्क’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. दरम्यान तिची ही इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या मेकअपमॅनचे कौतुक देखील केले आहे.