विद्यातल्या सच्चा कार्यकर्तीला असा प्रश्न पडणं साहजिकच होतं. म्हणून तर ती अण्णासाहेबांसारख्या मुरब्बी राजकारण्यासारख्या बोलणाऱया प्रकाशला म्हणाली,
‘‘आपण दोन-चार लोकांची मर्जी राखून बाकीच्यांना नाराज करत आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?’’
‘‘बाकीचे कोण? काठावर उभी असलेली? ती काठावरूनच ओरडतात. ओरडतात ओरडतात आणि मग गप बसतात. या भानगडीत कधी पडत नाहीत. आणि पडली तरी गुदमरून जातात. त्यामुळे त्यांची मर्जी राखली काय आणि नाही राखली काय काही फरक पडत नाही. आपल्याला सांभाळायची आहेत या सर्व माणसांना वळणारी माणसं. गुराखी जसा कधी प्रेमाने, कधी मुस्कं बांधून, तर कधी काठी दाखवून गुरं वळतो, तशी समाजातली ही दोन-चार माणसं सगळ्यांना वळीत असतात. आपल्याला समाजातल्या प्रत्येक माणसाची मर्जी सांभाळणं अवघड आहे. म्हणून सतूसारखी, सदाभाऊसारखी दोन-चार माणसं हाताशी धरावी लागतात. मग त्यांच्यापुढं काही लालूच टाकावं लागतं.’’
‘‘पण त्यामुळे आपण काही चांगल्या लोकांना दुरावतो त्याचं काय.’’
‘‘आपल्याला चांगल्या लोकांचं करायचंय काय? आपल्याला आपण टाकलेल्या तुकडय़ावर जगणारी माणसं पाहिजेत. हातातली भाकरी ओढणारी नकोत. तू ज्यांना चांगलं म्हणतीस अशा आदर्श लोकांकडूनच राजकारण्यांना खरा धोका असतो… तू रोहिदासचे एवढे गुण गातीस, पण एक दिवस तोच तुला धोक्याचा ठरेल.’’
विद्याच्या प्रत्येक शंकेचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रकाशकडे जणू तयारच असल्यासारखा तो बोलत होता. सतूने विहिरीच्या पैशातून गाडी घेतली, याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. विद्याला मात्र आपण एका गरिबाचं शेत हिरवं करू शकलो नाही याची खंत वाटली.
तालुक्यातल्या प्रत्येक गावात शक्य नसलं, तरी जामगावात काही चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणून ती म्हणाली,
‘‘जामगावमध्ये सतूला जसं पाठीशी घातलं तसं दुसरं कोणाला घालायचं नाही. आपल्याला सत्ता मिळाली त्यामागे जामगावमधील काही चांगल्या लोकांचा हात आहे. त्यांच्या नजरेतून मला उतरायचं नाही. विहिरीच्या योजनेत गैरप्रकार झाला. कदाचित बंधाऱयाच्या नावाखाली तो कोणाच्या डोळ्यावर यायचा नाही. पण बाकीच्या योजना गरिबांसाठी आहेत, तेव्हा त्यांचा वापर त्यांच्यासाठीच करायचा.’’
प्रकाश जमिनीकडे बघत क्षणभर शांत झाला. मग विचार करून बोलायला लागला. म्हणाला,
‘‘ठीक आहे, पण तू ज्यांना चांगलं म्हणतीस त्यात रोहिदास आहे. आपल्या बाबतीत त्याचा कोणाताच हस्तक्षेप मी सहन करणार नाही.’’
‘‘का?’’
विद्याने थोडय़ा आश्चर्याने विचारलं.
‘‘मी काय करतो याचा जाब कुणी विचारलेला मला आवडत नाही. पण तुला मिळालेली गाडी मीच जास्त वापरतो याचा आक्षेप घेणारा तालुक्यातला पहिला माणूस आहे तो.’’
कोणतरी, कधीतरी गाडीसंदर्भात बोलणार याची विद्याला कल्पना होती. तेव्हा रोहिदास असं बोलला याचं तिला अजिबात नवल वाटलं नाही. तिला  नवल वाटलं ते प्रकाशचंच. बायकोच्या नावाचा उपयोग करायचा आणि आपला स्वाभिमानही जपायचा! दोन्ही गोष्टी जपणं अवघड आहे. तिला एकदम पुढाऱयाची आठवण झाली. पंचायत समितीच्या कार्यालयात विद्यासमोर त्याची खाली गेलेली मान आठवली. त्याचा पडलेला चेहेरा आठवला. तेव्हा प्रकाश रोहिदासवर एवढा राग धरून का आहे याची तिला कल्पना आली.
अण्णासाहेब विद्याला कोंडीत पकडण्याची संधीच पाहत होते. गावची सरपंच नंदा असताना प्रकाशने  ग्रामविकास योजनांमध्ये हस्तक्षेप करून सतूला विहिरीसाठी कर्ज मिळवून दिलं. सतूने त्या पैशातून गाडी घेतली. प्रकाशने असं गावच्या  भानगडीत पडलेलं नंदाच्या नवऱयाला आवडणारं नव्हतं, पण आता प्रकाश पडला आमदारीणबाईंचा नवरा. त्याच्यापुढं काय चालणार! त्यातच जास्त अघावपणा केला तर सतूशी गाठ. तो कसा आहे ते त्याला चांगलंच माहीत. त्यामुळे कधी नाही ते त्याला गप बसावं लागलं. गप बसावं लागलं म्हणण्यापेक्षा सत्तेपुढं हात टेकावे लागले.
पण ही गोष्ट आता अण्णासाहेबांच्या कानावर गेली. ते नमणारे नाहीत. त्यांना आता एका घावात दोन शिकार करण्याची संधी मिळाली होती.
उद्योग प्रकाशने केला, पण अडचणीत आली विद्या.
सतूकडे तर त्यांना बघायचंच होतं. त्यामुळे या संधीचा त्यांनी चांगलाच फायदा घेतला.
सतूच्या गाडीचं प्रकरण त्यांनी सगळ्या तालुकाभर केलं. आयुष्यात पहिल्यांदाच विद्याला गुन्हा केल्यासारखं वाटलं. आपल्या प्रामाणिपणामुळे ताठ मानेने जगणारी विद्या पहिल्यांदाच लोकांसमोर जाताना शरमेने मान खाली घालायला लागली. अण्णासाहेबांनी राईचा पर्वत केला, याची तिला विलक्षण चीड आली. कार्यालयात येऊन या प्रकरणाविषयी विचारणाऱया लोकांचाही तिला राग येऊ लागला.
प्रकाश मात्र सगळं करून नामानिराळा होता. या प्रकरणातून विद्याला सहीसलामत बाहेर कसं काढायचं या विचारात असतानाच पुन्हा रोहिदासची आणि त्याची भांडणं झाली. हे विद्याला कळल्यावर ती रोहिदासला भेटायला गेली.

(क्रमश:)

– बबन मिंडे