वसई : नालासोपारा पूर्वेच्या आचोळे तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. याचा फटका तलावाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांना बसू लागला आहे. मंगळवारी सुरक्षा जाळी नसल्याने एका दृष्टीहीन वृद्धाचा तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या परिसरात आचोळे तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलावाचे पालिकेने सुशोभीकरण केले होते. यासाठी पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. या तलाव उद्यान परिसरात सकाळी व संध्याकाळी या परिसरात राहणारे नागरिक फेरफटका मारण्यासाठी तर लहान मुले खेळण्यासाठी येत असतात.मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावाच्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत तसेच सुरक्षा जाळ्या तुटलेल्या स्थितीत असल्याने अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत.
मंगळवारी भरतकुमार मेस्त्री (७०) या दृष्टिहीन वृद्धाचा सुरक्षा जाळी नसल्याने तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तलावाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पालिकेने वेळीच या तलावाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले असते तर अशी घटना घडली नसती असे सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी सांगितले आहे.
तलावाच्या ठिकाणी लहान मुलं येत असतात त्यामुळे खेळताना ते सुध्दा या तलावात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी तलावाला आधी सुरक्षा जाळ्या बसविण्यात याव्या अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. या तलावाची पाहणी करण्यात आली असून ज्या ठिकाणी सुरक्षा जाळ्या तुटल्या आहेत त्या तातडीने बसवून घेतल्या जातील असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
