कल्पेश भोईर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई:  अतिवेगाने वाहने चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे, विना हेल्मेट प्रवास, खड्डे, वाहनावरील नियंत्रण  सुटून अपघात अशा विविध प्रकारचे अपघात घडत आहेत. वसई, विरार भागात सात महिन्यात घडलेल्या अपघातात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी विरार विभागात ३७ तर वसई विभागात ४५ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> वसई समुद्रात बुडाले पिता-पुत्र; सेल्फी काढताना घडली दुर्घटना

मागील काही वर्षांपासून शहरात इतर अपघाताच्या घटनेपेक्षा रस्ते अपघातामुळे मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. वाहनांची वाढलेली संख्या यातच काही वाहनचालक नियमांचे पालन न करताच वाहने वेगाने चालवितात यामुळे सुद्धा अपघात घडत आहेत. तर दुसरीकडे मोठय़ा अवजड वाहनांच्या धडका लागणे, ओव्हर टेक करताना नियंत्रण सुटणे, दुचाकीवर स्टंटबाजी करणे याशिवाय पावसाळय़ात अनेक भागात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे रात्रीच्या सुमारास दिसून येत नसल्याने त्यात पडून सुद्धा अपघात घडले आहेत. वसई, विरारमधील परिमंडळ २ व ३ या वाहतूक विभागाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यात घडलेल्या अपघातात ८२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १३१ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. रस्ते अपघात कमी व्हावे यासाठी वाहतूक विभागाकडून जनजागृती करणे, कारवाया साठी मोहिमा राबविणे, अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करणे,  अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

सदोष रस्ते,  सिग्नल यंत्रणेचा अभाव

शहरांतर्गत वाढत्या अपघाताची अनेक कारणे आहेत. रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गतीरोधकांचा आणि सिग्नल यंत्रणाचा अभाव आहे. कालबाह्य झालेले टॅंकर रस्त्यावर आजही धावत आहे. या टॅंकरच्या धडकेमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहे तर टॅंकरच्या गळतीमुळे रस्त्यावर पडणार्या पाण्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात होत आहे. नालासोपारा-विरार रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला मात्र त्यात दुभाजक, गतीरोधक नव्हते. त्यामुळे पहिल्याच दिवशी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. वसई गास सनसिटी मार्गावरही भरधाव वेगाने वाहने जात असल्याने तेथेही अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

हेल्मेट सक्ती मोहीम पुन्हा सुरू होणार

रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.  दुचाकी चालविताना हेल्मेट नसल्याने डोक्याला दुखापत होऊन अनेक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.  हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा एकदा १ सप्टेंबर पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती वसई वाहतूक परिमंडळ २ चे पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सांगितले आहे. याआधी सुद्धा अशी मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली होती.

अपघातांचा तपशील

विभाग              मृत्यू         गंभीर जखमी

वसई                 ४५          ८२

विरार                 ३७          ४९

एकूण                 ८२         १३१

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 82 deaths in 7 months in road accidents in vasai virar zws