वसई : शहरात अतिधोकादायक इमारतींच्या कोसळण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेने नालासोपारा पूर्वेतील रहमतनगर येथे अतिधोकादायक इमारतीवर पोकलेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. पालिकेमार्फत या इमारतीतील रहिवाशांना आधीच इमारत खाली करण्यास सूचना दिल्या होत्या. येथील नागरिकांनी त्या सूचनेचे पालन करून इमारत खाली केली होती. त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपूर्वी वसई-विरार शहरासह राज्यात विविध ठिकाणी धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अतिधोकादायक असलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेनेही जीर्ण झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळून आल्या आहेत. त्या खाली करून जमीनदोस्त करण्याचे काम सुरू  केले आहे.

नुकताच विरारमधील प्रभाग समिती ‘क’अंतर्गत येणाऱ्या गावडवाडी व चंदनसार परिसरांतील अतिधोकायदाक इमारतींमध्ये वास्तव्याला असलेल्या रहिवाशांना महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात इमारतीबाहेर काढून धोकादायक इमारतींवर निष्कासनाची कारवाई केली आहे. यात गावडवाडी परिसरातील मधु निवास, जीवन निवास, मुकुंद निवास आणि नारायण निवास या इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे नारायण निवास आणि चंदनसारमधील जीवदानी इमारतीवर पालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली.

दरम्यान, अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करताना रहिवाशांना इमारतीबाहेर काढले जाते. डोक्यावरील छप्पर गेल्याने पावसापाण्यात या नागरिकांना राहावे लागणार आहे. पालिकेने अशा नागरिकांसाठी निवारा केंद्राची उभारणी करून त्यांना निदान दिलासा देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on high risk buildings ssh