वसई: वसई पश्चिमेच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास डॉल्फिन मृत अवस्थेत आढळून आला आहे. सुमारे आठ फूट लांबीचा व १२५ किलोग्रॅम वजनाचा हा डॉल्फिन होता. या मृत डॉल्फिन माशाला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून त्यात पुरण्यात आले आहे.

वसई पश्चिमेच्या भागात राजोडी समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यावर सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. बुधवारी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना किनाऱ्यावर मृत अवस्थेत डॉल्फिन आढळून आला.

या घटनेची माहिती जीवरक्षक जनार्दन मेहेर यांना मिळताच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले होते. अधिकाऱ्यांनी त्याची दुर्गंधी पसरू नये यासाठी त्याचा पंचनामा करून त्याला किनाऱ्यावर जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून पुरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. यामुळे समुद्री परिस्थिती खवळलेली असून समुद्रात उंच लाटा आणि वादळी हवामानामुळे डॉल्फिनला मोठ्या जहाजाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यापूर्वीच्या घटना

यापुर्वी जून २०२४ अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर ही २५ फूट लांबीचा देवमासा आढळून आला होता. मात्र तो परिसर बेटाच्या ठिकाणी असल्याने त्याची विल्हेवाट लावताना अडचणी निर्माण झाल्या होत्या.

२०२१ मध्ये सुरुच्या समुद्रकिनारी ही १२ फूट लांबीचा देवमासा मृत झाल्याचे आढळून आला होता.