वसई: वसई विरार शहरात काही औद्योगिक कारखान्यातून रासायनिक युक्त सांडपाणी प्रक्रियेविनाच उघड्यावर व नदी नाल्यात सोडले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकताच वसई पूर्वेच्या कामण परिसरात कारखान्यातील सांडपाणी थेट उघड्यावर सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील कारखान्यांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यापाठोपाठ औद्योगिक कारखाने ही वाढू लागले आहेत. यात अनेक कारखान्यात विविध प्रकारचे साहित्य तयार करण्यासाठी रसायन मिश्रित द्रव पदार्थ वापरले जातात. कारखान्यातून निघणारे सांडपाणी हे प्रक्रिया करून नाल्यात सोडणे आवश्यक आहे. असे असताना रसायन मिश्रित सांडपाणी नाल्यात, नदीत किंवा उघड्यावर सोडून दिले जात आहे. याचा मोठा फटका या खाडी व नदी पात्रात असलेल्या जैविक घटकांना बसू लागला आहे.
मागील काही वर्षात वसई पूर्वेच्या कामण, चिंचोटी, वसई, पेल्हार, नालासोपारा, विरार फाटा अशा विविध ठिकाणच्या भागात अनेक औद्योगिक कारखाने उभे राहिले आहेत. तर नव्याने ही कारखाने तयार होत आहेत.यात रासायनिक, साबणनिर्मिती, खाद्यतेल, स्टील आणि प्लास्टिक उत्पादन अशा विविध प्रकारच्या कारखान्यांचा समावेश आहे. नुकताच कामण येथील शांती इंडस्ट्रीयल इस्टेट येथील भागात एका कारखान्यातून पिवळ्या रंगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच हे पाणी नाल्यात सोडून दिले जात असल्याचे दिसून आले होते. तर यापूर्वी सुद्धा अशाच प्रकार समोर आला होता.अशा प्रकारामुळे पर्यावरणाला ही याचा धोका निर्माण झाला आहे. शहरात अन्यही भागात अशा प्रकारचे रासायनिक सांडपाण्याचा निचरा होत आहे. याकडे महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नसल्याने सर्रासपणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक मॅकेन्झि डाबरे यांनी केला आहे. या सांडपाण्याचा परिणाम नैसर्गिक जलस्त्रोत यावर होत असून मानवी आरोग्यासाठी हे हानिकारक आहे असे ही डाबरे यांनी सांगितले आहे. यासाठी शहरातील कारखान्यांतून सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी याची तपासणी करण्यात यावी व जे दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
जैवविविधतेला धोका
नदी व खाडी पात्रात अनेक नागरिक मासेमारी करुन त्यावर दैनंदिन उपजीविका करतात. विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात मासे मिळतात त्यातून चांगला रोजगार ही मिळतो. परंतु या रासायनिक सांडपाण्यामुळे मासे मृत होत असल्याने मासेही मिळत नाहीत तर दुसरीकडे नदी काठी अनेक शेतकऱ्यांची शेत जमिनीवर सांडपाण्याचा परीणाम होऊन यामुळे शेती नापीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधीच शहरातील विविध ठिकाणच्या भागात जलस्त्रोत दूषित झाले आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
कामण येथे कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्यानुसार सोमवारी महापालिका व आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तर शहरात सातत्याने आमचे सर्वेक्षण सुरू असते मागील वर्षभरात ५० ते ५५ कारखान्यात बंदीची कारवाई केली असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघरचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी सांगितले आहे.
प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या परवानगीशिवाय वीज जोडणी देऊ नये
मागील काही वर्षापासून वसई विरार शहरात बेकायदेशीर कारखाने उभे राहू लागले आहेत. त्यांना महावितरणकडून वीज जोडणी दिली जाते. मात्र काही कारखाने या नियमांचे पालन करीत नाहीत. प्रदूषण मंडळाची परवानगी कारखानदाराने घेतली आहे किंवा नाही हे पाहून वीज जोडणी देण्यात यावी असे आम्ही महावितरणला सांगितले आहे. याशिवाय पालिकेलाही याबाबत कळविले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.