लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वसई विरार शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी शोधून काढली असून तेथे विशिष्ट रसायनाचा वापर करून डासांचा समूळ नायनाट केला जाणार आहे. औषध फवारणी देखील आता दोन वेळेस करण्यात येणार आहे.

वसई विरार शहरात डासांची भयंकर समस्या वाढली आहे. संध्याकाळच्या वेळेत आकाशात पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे डासांचे थवे दिसत असतात. संध्याकाळच्या वेळी आकाशात पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे डासांचे थवे दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बसणे, फिरायला जाणे अवधड झाले आहे. डासांच्या उपद्रवामुळे संध्याकाळपासूनच नागरिकांना घरांच्या खिडक्या, दारं बंद करून हातात मच्छर मारण्याच्या बॅट घेऊन बसाव लागत आहे. डासांचा उपद्रव वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिकांनी संध्याकाळी उद्यानात, मोकळ्या जागेत फिरायला जाणे बंद केले आहे. या डासांमुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. जागोजागी असलेली उघडी गटारे, नाले, डबकी आणि त्यात साचलेले शेवाळे, झुडपे आदींमुळे डासांची समस्या वाढत आहे. शहरात नियमित फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी डासांच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

यामुळे आता पालिकेने डासांचा नायनाट करण्यासाठी डासांचा सर्वाधिक प्रभाव असलेली ठिकाणे शोधून काढली आहे. या ठिकाणी असलेल्या खाडी, नाले, डबक्यातील पाणवेली काढून तेथे विशिष्ट रसायनाची फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे डासांना ऑक्सीजन मिळणार नाही आणि डास समूळ नष्ट होतील, असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. या रसायनाची मात्रा कमी असल्याने खाडीतील इतर जीवतंतूवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औषध फवारणी आता दोन्ही वेळेस

डासांची समस्या सोडविण्यासाठी औषध फवारणी आता सकाळी आणि संध्याकाळी असा दोन्ही वेळेस करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले असून त्यानुसार कर्मचार्‍यांच्या कामाच्या पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली.

ही आहेत डासांचा प्रभाव असलेली ठिकाणे

  • विरार- गोकुळ टाऊनशीप, म्हाडा, तिरूपती नगर, खारोडी,बोळीज, आरजे नगर, फुलपाडा
  • नालासोपारा- समेळ पाडा, निळेमोरे, श्रीपस्थ, नालासोपारा-विरार लिंक रोड, हनुमान नगर, वसंत नगरी, कॅपिटल एरिया, सेंट्रल पार्क, मोहक सिटी, मनवेलपाडा
  • वसई- सनसिटी, ओम नगर, चुळणा गाव, वसई गाव, माणिकपूर, मधुबन, स्थानक परिसर

वार्षिक ४० कोटींची खर्च

डासांच्या निर्मूलनासाठी महापालिका वार्षिक ४० कोटींचा खर्च करत आहे. यासाठी रसायनावर सव्वा कोटी आणि मनुष्यबळावर सव्वा कोटी खर्च होत आहेत. महिन्याला साधाणर अडीच ते सव्वा तीन कोटी एवढा खर्च डास निर्मूलनासाठी करण्यात येत आहे

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai mrj