वसई: वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला होता. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून हा करोना रुग्ण संख्येत घट होऊ लागली आहे, तर दुसरीकडे करोनाने मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. तीन दिवसांतच १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून कमी झालेला करोना संसर्गाचा प्रादुर्भाव डिसेंबरअखेर व जानेवारीची सुरुवात होताच अधिक वाढला होता. त्यामुळे शहरातील निर्बंध कडक करण्यात आले होते, तर पालिकेची आरोग्य यंत्रणा ही सज्ज झाली आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत दिवसाला ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत होते; परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून वसई विरार शहरातील करोनाबाधित होण्याच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. आता दिवसाला सरासरी ३५० ते ४५० च्या घरात येऊन पोहोचली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे निम्म्यावर आले आहे. असे जरी असले तरी दुसरीकडे करोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील तीन दिवसांत १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आठ दिवसांत  एकूण १५  जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या मृत्यूमुळे शहराच्या चिंतेत भर पडली आहे.   १३ ते २० जानेवारी या आठ दिवसांत वसई विरार शहरात ४ हजार ७८२  करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १५ जणांचा यात करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे मृत्युसंख्या जरी घटत असली तरी मृत्यूची वाढती संख्या ही शहराच्या चिंतेत भर घालणारी आहे. आतापर्यंत शहरात एकूण ४ हजार ६८१ इतके करोनाबाधित रुग्ण सक्रिय असून त्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तसेच वसई विरार १९ जानेवारी रोजी ओमायक्रॉनची लक्षणे असलेला एक रुग्ण आढळून आला होता.

रुग्णवाढ आणि मृत्यू

दिनांक रुग्णसंख्या      मृत्यू

२० जानेवारी     ३५२    ०१

१९ जानेवारी            ४३२           ०५

१८ जानेवारी            ४४६    ०४

१७ जानेवारी     ३६६           –

१६ जानेवारी            ४५९    –

१५ जानेवारी            ७८७    –

१४ जानेवारी            ९८०    ०३

१३ जानेवारी      ८६०          ०२