वसई: वसई-विरारमधील नागरिकांना शासकीय कामांसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. पण, तहसील कार्यालयाने दाखले वाटपाच्या कामाला गती दिली असून, चालू आर्थिक वर्षाती ३७  हजाराहून अधिक दाखल्यांचे वाटप तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे. शासकीय कामे, शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, नोकरीसाठी अर्ज, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र अशा विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज भासते. तर अनेकदा या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामे रखडतात. वसई तहसील कार्यालयातून नागरिकांना विविध दाखले वितरित केले जातात. पण, तांत्रिक अडचणी, अर्जदाराकडे असलेली अपुरी किंवा चुकीच कागदपत्र, प्रक्रियेतील त्रुटींमुळे नागरिकांना दाखले मिळण्यास विलंब होत होता. तर या विलंबाविरोधात नागरिक, विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आंदोलनेही केली होती.

त्यामुळे आता वसई तहसील कार्यालयाकडून दाखले वाटपाच्या कामाला गती देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तहसील कार्यालयाकडून ३७ हजार ४३३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. वितरित करण्यात आलेल्या एकूण दाखल्यांमध्ये उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखल्यांची संख्या सर्वाधिक आहे. नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी हे दोन्ही दाखले महत्त्वाचे असल्याने त्यांची मागणी जास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दाखल्याच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन ही निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी केले आहे.

दाखले वाटपाची आकडेवारी

उत्पन्न दाखला (वैधता १ वर्ष)- १६,९०८

अधिवास (डोमिसाईल) दाखला – १०,१८८

उत्पन्न दाखला (वैधता ३ वर्ष) – ३,३७५

नॉन-क्रिमी लेअर दाखला – २,६७९

जातीचा दाखला – १,४७७

वरिष्ठ नागरिक दाखला – ९८८

रहिवासी दाखला – ९६१

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखला (EWS) – ४०८

EWS पात्रता दाखला – ४४९

एकूण दाखले – ३७,४३३

विशेष उपक्रमांचे आयोजन

दाखले वाटपाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी वसई तहसील कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळा-महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी मार्गदर्शक शिबिरे, पालकांच्या बैठका आणि खासगी व जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘शाळा तिथे दाखला अभियान’ अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.